जगाने सरळ चालावे म्हणून उलटी वारी!

सामना प्रतिनिधी । पंढरपूर

आषाढी वारीच्या सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी लाखो वारकरी विठुरायाचे नामस्मरण करीत पंढरीची वाट चालत आहेत. एक अवलिया वारकरी मात्र पंढरीच्या वाटेवर उलटे चालत चाललेत. त्यांची ही उलटे चालण्याची अचंबित क्रिया पाहून लोक मोठ्या उत्सुकतेने त्यांची विचारपूस करतात. बापूराव बंड असं या वारकऱ्याचं नाव आहे.

उलट्या वारीविषयी बापूराव बंड म्हणतात समाजाच्या प्रवाहाविरुद्ध चालणाऱ्या उलट्या लोकांनी सरळ चालावे यासाठी आपण ही वारी सुरु केली आहे. आळंदी ते पंढरपूर या उलट्या वारीच्या माध्यमातून आपण पालखी मार्गावरील लोकांना समता, बंधूता, अखंडता ठेवा असा संदेश देतो. शेतकऱ्यांना आत्महत्येपासून प्रवृत्त करण्यासाठी मी या उलट्या वारीच्या माध्यमातून जनजागृती करीत असल्याचे श्री विठ्ठलाचे अनोखे भक्त बापूराव बंड सांगतात. बापूरावांची ही १९ वी उलटी वारी आहे. यापूर्वी त्यांनी ७ वेळा सरळ वारी केली आहे. आळंदी ते पंढरपूर हे २४५ किलोमीटरचे अंतर बापूराव यांनी सात दिवसात पूर्ण करतात. या उलट्या प्रवासात ते श्री विठ्ठलाचा धावा करीत एकटेच चालत असतात बंड हे पुण्यातील फुरसुंगीचे रहिवासी आहेत.