परवीन सुलताना यांना पंडीत भीमसेन जोशी गौरव पुरस्कार

सामना ऑनलाईन, रत्नागिरी

प्रख्यात शास्त्रीय गायिका परवीन सुलताना यांना पंडीत भीमसेन जोशी गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला. आर्टसर्कलच्या संगीत महोत्सवासाठी रत्नागिरीमध्ये आल्या असताना परवीन सुलताना यांनी हा पुरस्कार मिळाल्याबद्दल मनोगत व्यक्त केले. पंडीतजींच्या पुढाकाराने मी मराठीमध्ये एक गीत गायले. त्या मराठी गाण्यासाठी मी खूप मेहनत घेतली असं त्यांनी सांगितलं. “रसिका तुझ्याच साठी एक गीत गात आहे” हे गाणे खूपच लोकप्रिय झाल्याची आठवण शास्त्रीय गायिका परवीन सुलताना यांनी सांगितली.

महाराष्ट्र शासनाचा पंडीत भीमसेन जोशी जीवनगौरव पुरस्कार शास्त्रीय गायिका परवीन सुलताना यांना आज जाहीर झाला. पुरस्कार जाहीर झाल्याचे कळल्यानंतर आपल्याला खूपच आनंद झाला. कारण आतापर्यंत अनेक पुरस्कार मिळाले असले तरी पंडीत भीमसेन जोशी यांच्या नावाने मिळालेला पुरस्कार हा मोठा असल्याची कबुली त्यांनी यावेळी दिली. पुढे त्या म्हणाल्या की मी बारातेरा वर्षांची असताना पहिल्यांदा पंडीत भीमसेन जोशी यांना भेटले. आसाममधून पण गायक येतात अशा शब्दात त्यांनी माझे कौतुक केले होते. त्यानंतर मी त्यांच्यासोबत अनेक कार्यक्रम केले. सवाई गंधर्व महोत्सवातही मी गाणे सादर केले. त्यानंतर त्यांनी मला मराठीमधून गाणे म्हणण्याबाबत सुचवले. गंगाधर महांबरे यांनी माझ्यासाठी एक गाणे लिहीले. ते गाणे मला डोळय़ांसमोर ठेवूनच लिहीले होते. कारण आसाममधून आलेली एक मुलगी मराठीमधून गाणार होती. काही दिवस मी मराठी शब्दोच्चार आणि मराठी भाषेवर मेहनत केली आणि ते गाणे मी गायले. हे गाणे रसिकांना आवडल्याबद्दल त्यांनी समाधानही व्यक्त केले.

शास्त्रीय संगीत हा मूळ पाया आहे. शास्त्रीय संगीत आपण शिकले पाहीजे. आज विदेशातून मुले शास्त्रीय संगीत शिकण्यासाठी आमच्याकडे येतात. अशावेळी शास्त्रीय संगीताची आवड आपल्यामध्ये निर्माण झाली पाहीजे. कारण ते आपले संगीत आहे. नाहीतर उद्या हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत गाण्यासाठी विदेशातून लोक बोलवावे लागतील असे मार्मिक उद्गार परवीन सुलतान यांनी काढले.

आपली प्रतिक्रिया द्या