परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदी पंडित चोखट

248

सामना प्रतिनिधी । परभणी

परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत ऐनवेळी माजीमंत्री सुरेश वरपूडकर यांच्याऐवजी उपाध्यक्ष पंडित चोखट यांची अध्यक्ष पदावर वर्णी लागली. रामप्रसाद बोर्डीकर गटाचे विजय जामकर यांचा ११/६ अशा फरकाने पराभव झाला आणि पंडित चोखट हे विजय झाले. माजी मंत्री सुरेश वरपूडकर यांचा अध्यक्षपदासाठीचा अर्ज ऐनवळी बाद झाल्यामुळे त्यांच्याच गटाचे पंडित चोखट यांची वर्णी लागली. पंडित चोखट हे याच बँकेवर उपाध्यक्ष या पदावर कार्यरत होते.

परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया मंगळवारी पार पडली. अध्यक्षपदासाठी माजी मंत्री सुरेश वरपूडकर यांनी ३ तर बँकेचे उपाध्यक्ष तथा वरपूडकर यांचे समर्थक पंडितराव चोखट व रामप्रसाद बोर्डीकर गटाचे विजय जामकर यांनी प्रत्येकी १ अर्ज दाखल केला होता. वरपूडकर यांच्या अर्जाला भाजपाचे हिंगोलीचे आ. तान्हाजी मुटकुळे यांनी आक्षेप घेतला. वरपूडकर हे प्रक्रिया मतदार संघातून निवडून आले आहेत. बँकेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी या मतदार संघातून निवडून आलेला सदस्य पात्र होवू शकत नाही, असा आक्षेप आमदार तानाजी मुटकुळे यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे नोंदविला. त्यानंतर सहकार अधिनियम कलम ७३ (ड) अंतर्गत वरपूडकर यांचा अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी बाद ठरविला. त्यामुळे वरपूडकर गटाकडून पंडितराव चोखट यांचा अर्ज कायम राहिला. यावेळी हात उंचावून मतदान घेण्यात आले. यामध्ये चोखट यांना ११ तर जामकर यांना ६ मते मिळाली. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी चोखट यांना ५ मतांनी विजयी घोषित केले. बँकेचे संचालक लक्ष्मणराव दुधाटे यांनी तटस्थ भूमिका घेतली.

आपली प्रतिक्रिया द्या