हाऊसफुल्ल – स्वप्नपूर्तीला बळ देणारा ‘पंगा’

1991

>> वैष्णवी कानविंदे-पिंगे

एखादी स्त्री खूप स्वप्न बघते, आयुष्यात जिद्दीने यश संपादन करते, पण वय आणि उत्साह सरतो तेव्हा आपली यशस्वी वाटचाल केवळ एका रंजक गोष्टीसारखी वाटत राहते. भूतकाळामध्ये कितीही मोठी शिखरं गाठली असली तरी भविष्यात मात्र त्याला पूर्णविराम आहे असं ठरवून ती स्वतःला मिटून घेते. ‘पूर्वी मी खूप काही केलं, पण आता मुलंबाळं, घर यामध्ये कुठे वेळ मिळतो?’ हे वाक्य आपण अनेक जणींच्या तोंडून अनेकदा ऐकलं असेल. यात प्रत्येक घरातल्या कथेवर आधारित ‘पंगा’ हा सिनेमा. या सिनेमातला सहज भाव, कंगना रणौतचा अगदी ओघवता अभिनय, बारकावे टिपत केलेलं दिग्दर्शन हे सगळं जुळून आल्याने हा ‘पंगा’ मनाला चटकन भावतो.

ही गोष्ट आहे एका कबड्डीपटूची. राष्ट्रीय पातळीवर कबड्डीमध्ये चमकल्यानंतर लग्न, मग मुलं, संसार या सगळ्यात ती अडकते आणि तिची कबड्डी मागे पडते. पुन्हा कधी खेळू असं तिला स्वप्नातदेखील वाटत नाही. मानसिक आणि शारीरिक पातळीवर तर ती कधीच मागे पडली असते आणि तिच्या नकळत तिने ते सत्य स्वीकारलेलंदेखील असतं. अशातच एक दिवस काही घडतं आणि त्यातून पहिल्यांदा लुटूपुटूचं, नंतर खरोखर पुन्हा एकदा देशासाठी खेळायचं स्वप्न ती पाहू लागते. मग काय होतं, ते स्वप्न किती खरं होऊ शकतं आणि ती पुन्हा उभी राहू शकते का? यावर आधारलेला सिनेमा म्हणजे ‘पंगा’.

हा सिनेमा पाहताना कधी खुदकन हसू येतं, कधी मन हळवं होतं आणि नकळतच डोळ्यांत पाणी येतं. ‘‘मैं एक मां हूं और मां के कोई सपने नही होते’’ असं जेव्हा ती म्हणते तेव्हा कुठेतरी त्या जागी आपण असल्याची भावना भक्कमपणे पुढे येते आणि बघता बघता त्या जगात आपण सामावून जातो.

यात कंगनाचा अभिनय तर उत्तम आहेच, पण यज्ञ भसीन या बालकलाकाराने कमाल केली आहे. त्याचा वावर आपल्याला नक्कीच सुखावून जातो. त्याशिवाय रिचा चड्डा, जस्सी गील, नीना गुप्ता या सगळ्यांनीच आपापली खेळी उत्तम सांभाळली आहे. त्यामुळे हा खेळ कुठेही थांबत नाही हे विशेष. बारकाव्याचं दिग्दर्शन आणि त्यातले अगदी सोपे आणि नेमके क्षण शोधणं, संवाद लेखन, उत्तम दृश्य योजना, संगीत, छायांकन हे सगळं छान जुळून आलं आहे.

पहिल्या अर्ध्या भागात जो चटपटीतपणा आहे, तो कदाचित मध्यांतरानंतर हरवल्यासारखा वाटतो. दुसरा भाग जरा खेचला गेलाय. कदाचित या मॅचचा निकाल काय लागणार हे आपल्याला ठाऊक असल्याने आपल्यात ती शिथिलता येत असेल, पण एकूणच ‘पंगा’ बघण्यात ‘पंगा’ मात्र अजिबात नाही. हा सिनेमा क्रीडा सिनेमा असला तरीही त्यात प्रत्येक स्त्रीचा एक स्वतंत्र आवाजदेखील आहे. हा सिनेमा करमणुकीसाठी आणि एकूणच जाणिवा अधिक धारदार बनवण्यासाठी प्रत्येकाने नक्की पाहावा.

  • सिनेमा -पंगा
  • दर्जा – ***
  • निर्माता – फॉक्स स्टार स्टुडिओज
  • दिग्दर्शक – अश्विनी अय्यर तिवारी
  • लेखक – नितीन मल्होत्रा, अश्विनी अय्यर तिवारी
  • पटकथा – नितेश तिवारी
  • संगीत – शंकर एहसान लॉय
  • छायांकन – जय पटेल
  • कलाकार – कंगना रणौत, जस्सी गील, रिचा चड्डा, नीना गुप्ता
आपली प्रतिक्रिया द्या