पन्हाळा किल्ल्यावरील मजारीची अज्ञातांकडून नासधूस, हिंदू-मुस्लिम ऐक्याने तणाव निवळला

सोशल मीडियातून ऐतिहासिक पन्हाळा किल्ल्यावरील तानपीर मजारसंदर्भात गेल्या तीन-चार दिवसांपासून चुकीचा संदेश पसरविण्यात आला होता. त्याविरोधात सर्वधर्मीय लोक एकवटल्यानंतर शुक्रवारी (दि. 25) या मजारची अज्ञातांकडून नासधूस करण्यात आल्याचा प्रकार समोर आला, यामुळे काही काळ वातावरण तणावपूर्ण बनले. पण अवघ्या काही तासांतच किल्ल्यावरील सर्वधर्मीयांनी एकत्रित येऊन तातडीने मजारची दुरुस्ती केली. हिंदू-मुस्लिम ऐक्याने तणाव निवळला.

पन्हाळ्यावरील पुसाटी बुरुज परिसरातील मजार शेकडो वर्षांपूर्वीची असल्याचा उल्लेख असून, सर्व समाजाचे श्रद्धास्थान आहे. पण, गेल्या तीन-चार दिवसांपासून सोशल मीडियातून या मजारसंदर्भात चुकीचे मेसेज पाठवून भावना भडकविण्याचे समाजकंटकांचे प्रयत्न होते. त्याविरोधात सर्वधर्मीयांनी एकत्रित येऊन संबंधितांवर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन पन्हाळा पोलिसांना दिले होते.

आज काही अज्ञातांनी पहाटेच्या सुमारास या मजारीची नासधूस केल्याचे दिसून आले. त्यानंतर किल्ल्यावर बंदची हाक देण्यात आल्याने, सर्व दुकाने व व्यवसाय बंद ठेवण्यात आले. दरम्यान, कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पन्हाळगडावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला.

गेल्या काही दिवसांपासून दंगली घडविण्याबाबत दबक्या आवाजात चर्चा होत असल्याने, अशा समाजकंटकांच्या मनसुब्यांना बळी न पडता, किल्ल्यावरील सर्वधर्मीय यानिमित्ताने एकवटले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन, अवघ्या एक ते दोन तासांत मजारीची डागडुजी करून सर्वधर्मीय बांधवांकडून या मजारीस गलिफ घालण्यात आला. यावेळी पोलिसांकडूनही योग्य खबरदारी घेण्यात आली, तर कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी केले आहे.