पदार्पणात पंकजचे बॉल्कलाईन 3.0 च्या जेतेपदावर शिक्कामोर्तब

अव्वल क्युईस्ट बंगळुरूच्या पंकज अडवाणीने व्यावसायिक सर्किटवर खेळणाऱ्या मुंबईच्या इशप्रीत सिंग चढ्ढावर चुरशीच्या अंतिम फेरीमध्ये 10-8 असा विजय मिळवत पदार्पणातच एनएससीआय ‘बॉल्कलाईन 3.0’ अखिल हिंदुस्थानी स्नूकर खुल्या स्पर्धेच्या जेतेपदावर शिक्कामोर्तब केले. 19-फ्रेमच्या अंतिम स्पर्धेत देशातील सर्वात निपुण क्यूईस्ट्समध्ये झालेल्या फायनलमध्ये काही तणावपूर्ण आणि रोमांचक क्षण पाहायला मिळाले. हा हाय-व्होल्टेज सामना पाहण्यासाठी बॉल्कलाईन एरिनावर मोठय़ा संख्येने उपस्थित राहिलेल्या चाहत्यांनी खेळाचा मनमुराद आनंद लुटला. इशप्रीतने 67 च्या ब्रेकसह पहिली फ्रेम जिंकून 1-0 अशी आघाडी घेतली. सुरुवातीची फ्रेम गमावल्यानंतर अडवानीने 79, 82, 73 आणि 86 अशा सलग चार फ्रेम्स जिंकताना पहिल्या 5-फ्रेम सत्रात वर्चस्व राखून 4-1 अशी आघाडी घेतली. ब्रेकनंतर इशप्रीतने गियर बदलला. 133 आणि 53 ब्रेकसह त्याने पंकजची आघाडी 3-4 अशी कमी केली.