मी शर्यतीत असेन आणि तोडणाऱ्यांना उत्तर देईन, पंकजा मुंडे यांचा एल्गार

आपल्याला कुणीच हात लावू शकत नाही. बजेट कसे घ्यायचे आणि काम कसे करायचं हे मी जाणते. बीड माझी जन्मभूमी आणि कर्मभूमी आहे. मी जिथे आहे तिथेच आहे. मी शर्यतीत असेन आणि तोडणाऱयांना उत्तर देईन, असा एल्गार आज भाजपाच्या राष्ट्रीय मंत्री पंकजा मुंडे यांनी दसऱयानिमित्त व्यक्त केला.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या पक्षांतराच्या चर्चेला देखील त्यांनी यावेळी पूर्णविराम लावला. मी घर बदलणार नाही, आहे तिथेच आहे, असे देखील यावेळी त्यांनी जाहीर केले. भगवान गडय़ावरील दसरा मेळाव्याला मार्गदर्शन करताना त्यांनी वरील एल्गार पुकारला. ऑनलाइन मेळाव्यानंतरही आज या ठिकाणी मोठय़ा प्रमाणात गर्दी झाली होती.

यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, आज माझ्याकडे कोणतंही पद नसताना लोकं आले. निवडणुकीनंतर काही लोकांना वाटले पंकजा मुंडे संपल्या. ज्यांना मी संपले असे वाटत होतं. त्यांनी ही जनसंपत्ती जरुर पहावी, असा टोला पंकजा मुंडे यांनी यावेळी लगावला.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाची सल पुन्हा एकदा त्यांनी यावेळी बोलून दाखविली. पक्षाचा विचार मोठा असतो. कोणत्याही व्यक्ती पक्षापेक्षा मोठा होऊ शकत नाही, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

शिवतीर्थावर शक्तीप्रदर्शन करायचे आहे

यावेळी शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला शुभेच्छा देताना पंकजा मुंडे म्हणाल्या, केवळ भगवानगडच नाही तर मुंबईतील शिवतीर्थ देखील भरून दाखवायचं आहे. तिथं शक्तीप्रदर्शन करायचं असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली.

शेतकऱयांसाठी 10 हजार कोटींचे पॅकेज पुरसे नाही

10 हजार कोटीचं पॅकेज सरकारने घोषित केले. हे पॅकेज पुरेसं नाही. या दहा हजार कोटीच्या पॅकेजमध्ये साधा रुमालही येणार नाही, अशी टीकाही पंकजा मुंडेंनी केली. या पॅकेजने शेतकरी, ऊसतोड कामगारांची दिवाळी कशी गोड होणार? असा सवाल करतानाच हे पॅकेज वाढविण्याची मागणी त्यांनी यावेळी केली.

आपली प्रतिक्रिया द्या