सावरगाव येथे होणार पंकजा मुंडे यांचा मेळावा; भगवानगड कृती समितीचीही मेळाव्याची तयारी

दसरा मेळाव्याच्या मुद्यावरून पंकजा मुंडे समर्थक व विरोधक असे दोन गट पडल्याचे दिसत आहे. मुंडे समर्थक गटाने बीड जिल्ह्यातील सावरगाव येथे पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत होणाऱ्या मेळाव्याला सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे. तर भगवानगड दसरा मेळावा कृती समितीने भगवानगडाच्या पायथ्याला मेळावा घेण्याची तयारी सुरु केल्याने दसरा मेळावा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.

भगवानगडाचे महंत डॉ. नामदेवशास्त्री यांनी गडावर भाषणबंदी केल्यानंतर पंकजा मुंडे यांनी पाच वर्षांपासून भगवानबाबांचे जन्मस्थळ असलेल्या बीड जिल्ह्यातील सावरगाव येथे मेळावा घेण्यास सुरवात केली. या मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन तालुक्यातील मुंडे समर्थकांनी केले आहे. मात्र, आता भगवानगड कृती समितीनेही गडाच्या पायथ्याला मेळावा घेण्याची जोरदार तयारी सुरु केली आहे. या मेळाव्यास परवानगी द्यावी अशी मागणी पोलिसांकडे भारजवाडी येथील आजिनाथ बटुळे यांनी केली आहे. या मेळाव्यासाठी शिवराज बटुळे यांनी आपली जागा देण्यास संमती दिली आहे.

पोलिसांनी या मेळाव्याला परवानगी नाकारली आहे. या मेळाव्याला गडाच्या पाच कि.मी. परिसरात परवानगी देऊ नये, असा ठराव या परिसरातील खरवंडी कासार,मालेवाडी व घोगस पारगाव या ग्रामपंचायतीना केला आहे. गडाच्या पायथ्याला मेळावा घेण्यासाठी संभाजीनगर येथील बाळासाहेब सानप यांनी पुढाकार घेतला असून या मेळाव्याला आता पंकजा मुंडे समर्थकांनी विरोध केल्याने दसरा मेळावा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.