कोपर्डीचा निकाल महिलांना बळ देणारा – पंकजा मुंडे

सामना प्रतिनिधी । बीड

कोपर्डी घटनेचा न्यायालयाने दिलेला निकाल राज्यातील तमाम महिलांना बळ देणारा आहे. अशा घटना भविष्यात पुन्हा घडू नयेत यासाठी शासन व प्रशासन कठोर पावले उचलेल अशा शब्दांत राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.

‘कोपर्डी प्रकरणातील तीनही आरोपींना न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. हा निकाल समाधानकारक असून महिलांना निश्चितच बळ देणारा आहे. कोपर्डीच्या छकुलीचा आक्रोश राज्यभर पडसाद ऊमटवणारा ठरला असुन अशा कठोर शिक्षेमुळे समाजघातक तत्वांमध्ये कायद्याचा धाक निर्माण होण्यास नक्कीच मदत होईल असेही पंकजा मुंडे यांनी नमूद केले आहे. ‘ज्या महिलांवर, बालिकांवर अत्याचार होतो, त्यांच्या पाठिशी न्याय व्यवस्था व शासन उभे असल्यास नक्की शिक्षा होते, हे यावरून दिसून आले आहे. कोपर्डी सारखा प्रकार भविष्यात होऊ नये, तसेच आमच्या कोणत्याही बहिणीवर अशी वेळ येऊ नये, हिच इच्छा! परंतु, जर अशी एखाद्यावर वेळ आली तर शासन व प्रशासन त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभा राहील. अशा घटनांमधील आरोपींना तात्काळ सजा मिळाली पाहिजे’, असेही पंकजा मुंडे म्हणाल्या.

आपली प्रतिक्रिया द्या