पुढे काय करायचं? कोणत्या मार्गाने जायचं? पंकजा मुंडे यांच्या ‘पोस्ट’ची चर्चा

1142

‘पुढे काय करायचं? कोणत्या मार्गाने जायचं? याबाबत मी 12 डिसेंबरला सांगेन’, अशी फेसबुक पोस्ट भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केल्याने राजकीय चर्चा सुरू झाली आहे.

परळी मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवणाऱया पंकजा मुंडे यांचा राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी धक्कादायक पराभव केला. त्यानंतर राज्यात महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकारही स्थानापन्न झाले. आता पुढची रणनीती काय? याविषयी पंकजा मुंडे 12 डिसेंबर म्हणजेच दिवंगत वडील गोपीनाथ मुंडे यांच्या जन्मदिनी ठरविणार असल्याचे त्यांनी फेसबुकवर लिहिले आहे.

आज राजकारणामध्ये झालेले बदल, जबाबदारीत झालेले बदल या सगळय़ा बदलत्या संदर्भांचा विचार करून आपला पुढचा प्रवास ठरविण्याची आवश्यकता आहे. आपण माझ्याकडे वेळ मागत आहात… मी आपल्याला वेळ देणार आहे. आठ ते दहा दिवसांनंतर… हे आठ-दहा दिवस मला थोडासा स्वतःशी संवाद साधण्यासाठी वेळ हवाय, असे पंकजा मुंडे यांनी फेसबुकमध्ये म्हटले आहे. या पोस्टची चर्चा सुरू झाली असून 12 तारखेला त्या काय बोलणार याकडे सगळय़ांचे लक्ष लागले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या