गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीला गोपीनाथ गडावर गर्दी करू नका; पंकजा मुंडे यांचे आवाहन

731

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम 3 जून रोजी गोपीनाथ गडावरच होईल. मात्र, कार्यक्रम लाईव्ह करण्यात येणार आहे. त्यामुळे कोणीही गडावर गर्दी करु नये, असे आवाहन पंकजा मुंडे यांनी केले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी जनतेला हे आवाहन केले आहे. 3 जून कधी उजाडायलाच नको, असे वाटते, अशी भावक पोस्टही त्यांनी फेसबुकवर केली आहे. गोपीनाथ मुंडे यांनी 3 जूनला घरी राहूनच अभिवादन करा, अशा सूचनाही पंकजा मुंडे यांनी केलया. या दिवशी मुंडे साहेबांच्या आवडीचा पदार्थ करायचा आणि घरातच फोटोसमोर दोन दिवे लावून त्यांना अभिवादन करायचे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

या वर्षी गोपीनाथ मुंडे यांचा सहावा पुण्यस्मरण दिन आहे. हा दिवस ‘संघर्ष दिन’ म्हणून मुंडे समर्थक पाळतात. मात्र, यंदा कोरोनामुळे गर्दीच्या सर्वच कार्यक्रमावर बंदी आहे. त्यामुळे गोपीनाथ गडावर मोजक्या लोकांच्या उपस्थितीत पुण्यतिथी कार्यक्रम होणार आहे. पुण्यतिथीचा कार्यक्रम सोशल मीडियाद्वारे लाईव्ह करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी दर्शन घेण्यासाठी किंवा मला भेटण्यासाठी येऊ नये, असा आवाहनही पंकजा मुंडे यांनी केले आहे.

3 जून रोजी नागरिकांनी आपापल्या घरात मुंडे साहेबांच्या फोटोसमोर उभे रहा. उजव्या बाजूला घरातील महिला, तर डाव्या बाजूला पुरुष उभे राहतील. आजी, सून, नात उजवीकडे तर आजोबा, मुलगा,नातू डावीकडे असे उभे राहून दोन समई किंवा दिवे लावून अभिवादन करा. मुंडे साहेबांच्या आवडीचा पदार्थ करा, तो काय हे मी सांगायची गरज नाही. दोन दिवे लावण्यास मी सांगितले. ते स्त्री-पुरुष समानतेचा संदेश देणारे आणि समानता जगणारे म्हणून लावायचे असे त्या म्हणाल्या. दुपारी 12 ते संध्याकाळी 6 या वेळेत अन्नदान, रक्तदान, मास्क किंवा औषधाचे वाटप करा, त्याचे फोटो सोशल मीडियावर पाठवा. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्वतःला जपा, गर्दी करू नका, घरात रहा, तुमच्या जीवाची काळजी साहेबांच्या एवढीच मला आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या