आता बोलायची वेळ आली आहे… बीडमध्ये पंकजा मुंडे यांचे सूचक विधान

भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे पक्षात नाराज असल्याची चर्चा आहे. नाशिकमधील सभेत ‘मी कुणासमोरही झुकणार नाही’ असे विधान त्यांनी केले होते त्याची राजकीय वर्तुळात चर्चा झाली. त्यानंतर आता बीड येथील एका कार्यक्रमात पंकजा मुंडे यांनी आता बोलायची वेळ आली आहे, असे सूचक विधान केले आहे. प्रत्येकवेळी आपला तो बाब्या आणि दुसऱ्यांचं ते कार्टं… असे म्हटले तर आपल्या बाब्याला कार्टं व्हायला फार वेळ लागणार नाही, असेही त्या म्हणाल्या.

आता पुन्हा एकदा पंकजा मुंडे यांचे एक विधान समोर आले आहे. बोलणाऱ्यांचे अंबाडे विकतात आणि न बोलणाऱ्यांचे गहूही विकत नाहीत. आता बोलायची वेळ आली आहे, असे विधान पंकजा मुंडे यांनी केले. त्या परळी तालुक्यातील शेलु येथे जलजीवन मिशन अंतर्गत विकास कामाचा शुभारंभ प्रसंगी बोलत होत्या. मी कधीही श्रेय घेण्यासाठी आले नाही. पण आता बोलणाऱ्यांचे अंबाडे विकतात आणि न बोलणाऱ्यांचे गहूही विकत नाही, असे म्हणत पंकजा मुंडे यांनी श्रेय वादावरही भाष्य केले.

पंकजा मुंडे म्हणाल्या की, आता नारळ फोडताना काही लोकांनी माझ्या हातात नारळ दिला आणि नारळ फोडायला सांगितले. पण मला हे अवघड जात आहे. आता मी नारळ फोडायला सुरुवात केली आहे. मागच्या पाच वर्षात मी नुसती कामे दिली. नारळ कुणी फोडले? माहीत नाही. पण आता नारळ फोडून-फोडून माझा तर हातच दुखायला लागला आहे. त्यामुळे मी त्यांना म्हटले, आता माझ्याकडून नारळ फोडणं शक्य नाही, तुम्हीच नारळ फोडा. मी काही इथल्या कामाचे श्रेय घ्यायला आले नाही. पण आता काय करणार? कारण आता जग वेगळे आहे. आता बोलणाऱ्यांचे अंबाडे विकतात आणि न बोलणाऱ्यांचे गहूही विकत नाहीत. त्यामुळे आता बोलायची वेळ आली आहे. आपण आपलं वाजवून सांगितलं नाही, तर लोकांच्या लक्षात येणार नाही, असे त्या म्हणाल्या. त्यामुळे त्यांच्या या विधानाचीही राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे.