सर्वत्र उत्सुकता, पंकजा मुंडे आज काय बोलणार…

646

‘मला जे काय बोलायचे आहे ते गोपीनाथ गडावरच्या मेळाव्यातच बोलेन’ असे सांगून पंकजा मुंडे यांनी भाजपची धडधड वाढवली आहे. परळीत झालेला पराभव, पक्षात होणारी अवहेलना या सर्व पार्श्वभूमीवर नाराजीचे निशाण हाती घेतलेल्या पंकजा गोपीनाथ गडावरच्या मेळाव्यात काय बोलणार याबद्दल सर्वत्र उत्सुकता आहे.

परळी विधानसभा मतदारसंघात झालेला पराभव भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. विजयाचा घास हातातोंडाशी असताना पक्षातीलच स्वकीयांनी गद्दारी करून आपल्याला पराभवाच्या गर्तेत ढकलले अशी पंकजा मुंडे यांची भावना आहे. फेसबुकवर त्यांनी एक पोस्ट व्हायरल करून आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली होती. कार्यकर्त्यांशी संवाद साधण्याची आपली इच्छा आहे, त्यांच्याशी ‘मन की बात’ करायची आहे, पण 12 डिसेंबर रोजी गोपीनाथ गडावर होणार्‍या मेळाव्यातच हा संवाद होईल असे पंकजा यांनी सांगितले.

पंकजा यांच्या या पोस्टमुळे भाजपचा चेहराच काळवंडला. पंकजा मुंडे यांची नाराजी दूर करण्यासाठी भाजपच्या पदाधिकार्‍यांनी धावाधाव सुरू केली. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी खास पत्रकार परिषद घेऊन पंकजा मुंडे या नाराज नसल्याचे सांगितले, मात्र पंकजा मुंडे यांनी पक्षाच्या बैठकांना दांडी मारून पुन्हा आपला मनसुबा व्यक्त केला. संभाजीनगर येथे झालेल्या विभागीय बैठकीकडेही त्यांनी पाठ फिरवली. येथेही चंद्रकांत पाटील यांनी पंकजा आजारी असल्यामुळे आल्या नसल्याचे सांगून त्या आपल्या परवानगीने गैरहजर असल्याची सारवासारव केली होती. पत्रकारांनी वारंवार छेडूनही पंकजा मुंडे यांनी आपण गोपीनाथ गडावरच्या मेळाव्यातच भूमिका मांडणार असल्याचे ठामपणे सांगितले. ‘हा आपला स्वाभिमान दिवस आहे’ असे ट्विटही त्यांनी केले. उद्या गोपीनाथ गडावर होणार्‍या मेळाव्याला भाजप नेते एकनाथ खडसे, विनोद तावडे, प्रकाश मेहता, चंद्रशेखर बावनकुळे आदींची उपस्थित राहणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. एकूणच राजकीय क्षेत्रात भूकंप आणणार्‍या या मेळाव्यात पंकजा मुंडे काय बोलणार याबद्दल सर्वत्र उत्सुकता आहे.

आपली प्रतिक्रिया द्या