पंकजा मुंडे यांचा उद्या ‘स्वाभिमान दिन’

1549

परळी या भाजपच्या पारंपरिक मतदारसंघातून  पराभव झाल्याने माजी मंत्री पंकजा मुंडे मागील काही दिवसांपासून अस्वस्थ आहेत. फेसबुक, ट्विटरच्या माध्यमातून आपली नाराजी व्यक्त करणाऱ्या पंकजा यांनी 12 डिसेंबर रोजी ‘स्वाभिमान दिवस’ आयोजित केला आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या मेळाव्यात पंकजा मुंडे नेमकी काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पंकजा मुंडे यांचा पराभव विरोधकांकडून नक्हे तर पक्षांतर्गत विरोधकांनीच केल्याची भावना महाराष्ट्रातील भाजपच्या अनेक नेत्यांची आहे. या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांनी केलेल्या ट्विटमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. ‘12 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता आपल्या लोकनेत्याच्या स्मरणार्थ आपल्या सर्वांना गोपीनाथ गड येथे आमंत्रण, तुम्ही सारे या .. हा दिवस आपला स्वाभिमान दिवस आहे. तुम्ही ही या .. वाट पहाते’, असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. हा दिवस आपला ‘स्वाभिमान दिवस’ आहे,  या वाक्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्ककितर्क वर्तविले जात आहेत.

आज राजकारणामध्ये झालेले बदल, जबाबदारीत झालेले बदल या सगळ्या बदलत्या संदर्भाचा विचार करुन आपला सर्वांचा पुढचा प्रवास ठरवण्याची आवश्यकता आहे. पुढे काय करायचं? कोणत्या मार्गाने जायच? आपल्या लोकांना आपण काय देऊ शकतो? आपली शक्ती काय? लोकांची अपेक्षा काय? या सगळ्या गोष्टींचा सर्वांगाने विचार करुनच मी 12 डिसेंबर रोजी आपल्या समोर येणार अशी भावनीक फेसबुक पोस्ट पंकजा मुंडे यांनी यापुर्वी केली होती. यामुळे उद्या गोपीनाथ गडावर होणाऱ्या मेळाव्यात त्या नेमकी काय भूमिका जाहीर करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

खडसे, तावडे, मेहता गोपीनाथ गडावर जाणार

भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या जन्मदिनी गोपीनाथ गडावर आयोजित मेळाव्याला भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, माजी मंत्री विनोद तावडे, प्रकाश मेहता आदी नेते उपस्थिती लावणार आहेत. विधानसभा निवडणुकीत उमेदवारी नाकारल्याने भाजप नेतृत्वार नाराज असलेले नेते या मेळाव्यास आवर्जून उपस्थित राहणार असल्याने गोपीनाथ गडावर नेमके काय घडते याची उत्सुकता सर्वांना आहे.

आपली प्रतिक्रिया द्या