पंकजा मुंडे पक्ष सोडणार नाहीत, भाजप नेत्यांचे स्पष्टीकरण

1355
chandrakant-patil

माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी फेसबुक पोस्ट लिहून 12 डिसेंबर रोजी गोपीनाथ गडावर येण्याचे आवाहन केले होते. आता त्यांनी अपल्या ट्विटर प्रोफाईलवरून भाजपचा नामोल्लेख टाळला आहे. त्यामुळे पंकजा मुंडे पक्ष सोडणार का अशी चर्चा सुरू झाली आहे. पंकजा मुंडे पक्ष सोडणार नाही असे स्पष्टीकरण भाजप नेत्यांनी केले आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की “पंकजा मुंडे या पक्ष सोडणार अशा बातम्या प्रसारित होत आहेत. त्या सर्व खोट्या आहेत. पंकजा मुंडे यांनी पक्षात मोठी पदे भुषवली आहेत. दोनदा आमदार आणि एकदा मंत्रीसुद्धा राहिल्या आहेत. त्या पक्ष सोडण्याचा विचार करणार नाहीत.”

12 डिसेंबरला स्व. गोपीनाथ मुंडे यांची जयंती मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. त्या कार्यक्रमाला भाजपचे सर्व नेते हजर असतात. पराभवानंतर प्रत्येक व्यक्ती आत्मपरीक्षण करत असतो. पंकजा मुंडे या कालही भाजपमध्ये होत्या, आजही आहेत आणि उद्याही असतील असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.

तर पंकजा यांच्या आतेबहीण आणि खासदार पूनम महाजन यांनी पंकजा सोडणार नाही असे म्हटले आहे. तसेच पंकजा मुंडे यांनी जी फेसबुक पोस्ट लिहिली आहे त्याचा आणि पक्ष सोडण्याचा संबंध नाही. कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात गर्दी व्हावी यासाठी पंकजा यांनी फेसबुक पोस्ट लिहिल्याचे पूनम महाजन यांनी सांगितले.

पंकजा मुंडे या भाजप सोडतील अशी शक्यता माजी मंत्री आणि भाजप नेते विनोद तावडे यांनी फेटाळून लावली आहे. पंकजा मुंडे यांच्या निष्ठेवर भाजपचा पूर्ण विश्वास आहे. माझं त्यांच्याशी फोनवरून चर्चा झाली असून त्यांनी फेसबुकवरून कार्यक्रमाचे निमंत्रण दिल्याचेही तावडे यांनी नमूद केले.

आपली प्रतिक्रिया द्या