तापमानातील बदल

<<पंकजकुमार पाटील>>

ऋतुमानानुसार उन्हाळा सुरू झालेला आहे. मात्र या वर्षी सूर्यदेव अक्षरशः आग ओकताना दिसतोय. काही दिवसांपूर्वी मुंबई-ठाण्यातील दिवसाचे तापमान तब्बल ४१-४२ अंश सेल्सिअसपर्यंत गेल्याने  पुढील एक सवा महिना कसा जाईल याचा ट्रेलर सर्व नागरिकांना अनुभवायला मिळाला. अर्थात ही तापमानवाढ अचानक उद्भवलेली नाही. केवळ तापमानवाढच नाही तर गेल्या काही वर्षांत हवामान-ऋतूंमध्ये होत असलेले बदल (ऋतूंची सरमिसळ) हे निसर्गात ढवळाढवळ होत असल्याचे पुरावे आहेत. पर्यावरणाचा विचार न करता वर्षानुवर्षे पृथ्वीवरील मनुष्यप्राणी निसर्गावर जे अत्याचार करीत आलाय व करीत आहे त्यातूनच झालेले नैसर्गिक बदल व तापमानवाढीसारखे संकट तापदायक ठरत आहे. औद्योगिकीकरण-यांत्रिकीकरण करणे ही काळाची गरज असली तरी सर्व बाबतीतले नियम पायदळी तुडवून औद्योगिकीकरणाचे-आधुनिकीकरणाचे वाढते प्रमाण जल-वायू-ध्वनिप्रदूषणाच्या नव्या समस्या निर्माण करीत आहेत. सार्वजनिक वाहनांच्या वापराऐवजी स्वतःच्या वाहनाने प्रवास करण्याच्या वृत्तीमुळे रस्त्यावरील खासगी गाडय़ांची संख्या वाढली जाऊन सर्वच प्रकारच्या प्रदूषणात आणखीन भर पडत आहे. डोंगर-दऱ्या सपाट करून, नद्यांची पात्रे अरुंद करून, समद्रकिनारे मागे हटवून आज इमारती-टॉवरची बांधकामे होताहेत. हे करताना तिथली पर्यावरणपूरक निसर्गसंपदा सर्वांच्या स्वार्थीपणातून संपूर्ण उद्ध्वस्त होताना दिसते. हिरवाईची जागा सिमेंट काँक्रीटच्या जंगलाने वेढून टाकल्याचे शहरामंधील चित्र आहे. त्यामुळे प्राणिमांत्रासह, मानवसमूहाला व निसर्गाला हानीकारक ठरेल अशा प्रकारचा विकास वेळीच थांबवण्याची गरज आहे. आपल्या इथे वृक्षलागवड केवळ प्रसिध्दी अन् फोटोपुरती होते.पण लावलेली झाडे किती जगली वाढली याबाबत कुणालाच फारसे देणे घेणे नसते.  एकंदरीत हा निसर्ग आपणास सर्वच गोष्टी भरभरून देऊन आपणास सुखा-समाधानाने जगवण्यास मदत करत असतो. मात्र त्याच निसर्गासोबत जर स्वतःच्या स्वार्थीपणासाठी कृतघ्नपणा दाखवून विविध प्रकारचे अत्याचार करत राहिलो तर तो मानवजातीवर सूडच उगवेल हे वेगळे सांगायला नको.