उल्हासनगरात भरवस्तीत थरार, ‘चायपाण्या’साठी बिबट्या घुसला बंगल्यात

60

सामना ऑनलाईन । उल्हासनगर

सकाळी साडेसातची वेळ… भाटिया चौकातील बंगल्यात राहणारे असरानी कुटुंब मस्त चहाचा आस्वाद घेत होते… इतक्यात ते ‘धुड’ घरात घुसले… त्याला पाहताच असरानी कुटुंबाची पाचावर धारण बसली. त्यांनी थेट बंगल्याच्या दरवाजाला कडी घालून बाहेर धूम ठोकली. त्यांच्या घरात सकाळीच भलामोठा बिबट्या घुसला. बिबट्याने बंगल्यात मुक्काम ठोकल्याची बोंबाबोंब झाली आणि भाटिया चौकात दाणादाण उडाली. अखेर वनविभागाच्या अधिकाऱ्यांना सहा तासांच्या थरारक कामगिरीनंतर बिबट्याला जेरबंद करण्यात यश आले आणि उल्हासनगरवासीयांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

भाटिया चौकातील सोनम क्लासेसच्या आवारात सकाळीच एक बिबट्या घुसला. आसऱ्यासाठी तो जागा शोधू लागला, परंतु इथे लपण्यासाठी जागा न मिळाल्याने तो थेट चालत गेटमधून बाहेर पडला. क्लासचा शिपाई रवी कुंभार याला कुत्रा आहे, असे वाटले म्हणून तो हाकलण्यासाठी त्याच्या मागे धावला, पण तो बिबट्या आहे हे पाहताच त्याची तंतरली.

तोपर्यंत बिबट्या रस्ता ओलांडून पलीकडे गेला. तेथे सुरेश असरानी यांच्या बंगल्याभोवतीची १२ फूट उंच भिंत त्याने उडी मारून ओलांडली आणि तेथील बंगल्यात शिरला. सकाळची वेळ असल्याने असरानी कुटुंबाचे चहापाणी सुरू होते. नेमके त्याचवेळी बिबट्याला बंगल्यात घुसलेले त्यांनी पाहिले आणि जिवाच्या आकांताने त्यांनी बंगल्याबाहेर धाव घेतली. बाहेर पडताना त्यांनी दाराला कडी घातली. बिबट्या बंगल्यात घुसल्याची खबर उल्हासनगरात वाऱ्यासारखी पसरली आणि भाटिया चौकात तुफान गर्दी उसळली.

ही खबर कळताच सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक घनश्याम पतंगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक कौराती, उपनिरीक्षक दिलीप चव्हाण, अंकित दिघे, ठाण्याचे उपवन संरक्षक जितेंद्र रामगावकर, परिक्षेत्र वनअधिकारी चंद्रकात शेळके, अंबरनाथचे वनपाल एन. एम. माने, उल्हासनगरचे वनपाल संजय पवार, पशुवन विभागाचे डॉ. पेठे यांच्यासह शीघ्र बचाव दलाने घटनास्थळी धाव घेतली.

गवताच्या ट्रकमधून आला की काय?
उल्हासनगरचा हा परिसर अत्यंत गजबजलेला असून येथे आसपास कोणतीही जंगलपट्टी नाही. त्यामुळे बिबट्याच्या दर्शनाने सारेच चक्रावले होते. भाटिया नगर परिसरात गुरांचा तबेला आहे. तेथील जनावरांना कसाऱ्याच्या जंगलातून ट्रकमधून चारा आणला जातो. या ट्रकमध्ये बिबट्या चढला असेल आणि ट्रक थांबल्यावर या परिसरात पायउतार झाला असेल अशी चर्चा घटनास्थळी सुरू होती.

भिंतीला होल पाडून इंजेक्शन ठोकले
दार उघडले तर बिबट्या हल्ला करण्याची भीती होती, म्हणून वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी भिंतीला ड्रील मशीनने होल पाडले आणि दुर्बिण लावून बिबट्यावर नजर रोखली. बिबट्या थ्री रूम किचनच्या बंगल्यात घिरट्या घालत होता. तो टप्प्यात दिसताच बंदुकीतून इंजेक्शन सुटले आणि त्याने थेट बिबट्याचा वेध घेतला. यानंतर बिबट्या बेशुद्ध झाल्याची खात्री झाल्यानंतर बंगल्याचे दार उघडून बिबट्याला बाहेर काढले.

आपली प्रतिक्रिया द्या