बळीराजासाठी पनवेलकरांचा जवळा-भाकरीचा घास

27

सामना ऑनलाईन । नवी मुंबई

गरमागरम तांदळाच्या भाकऱ्यांची चवड… जवळा-सुकटीच्या कालवणाचा घमघमाट… सोबतीला कांदा आणि चवीला लोणचं असा बेत होता… या गावरान जेवणाचा खमंग दरवळ सुटला होता. एकापाठोपाठ एक गाठोडी येऊ लागली आणि पाहता पाहता एक लाख भाकऱ्या गोळा झाल्या. या भाकऱ्यांसोबत तब्बल साडेपाचशे किलो सुकटीच्या कालवणाची पाकिटे एका ट्रकमधून आझाद मैदानाकडे रवाना झाली तेव्हा आंदोलनकर्त्या बळीराजाच्या मुखाला आपल्या घरातला घास मिळणार याचा आनंद पनवेल-उरणकरांच्या डोळ्यांत होता.

नाशिकहून १८० किलोमीटरचे अंतर पायी कापून आलेल्या बळीराजाचा मुक्काम सध्या आझाद मैदानात आहे. ४० हजारांहून अधिक शेतकरी आरपारच्या लढाईसाठी तहान-भुकेची पर्वा न करता ठिय्या देऊन बसले आहेत. या अन्नदात्याला आपल्या घरातले अन्न मिळावे म्हणून पनवेल आणि उरणच्या घराघरातून जवळा-भाकरी पाठविण्याचे आवाहन रविवारी करण्यात आले होते. त्याला गावकऱ्यांनी उदंड प्रतिसाद दिला. या गावातल्या घराघरात गृहिणींनी सकाळी भाकऱ्या थापून शेतकऱ्यांचे जेवण बनवले. सकाळी नऊ वाजेपर्यंत एक लाख भाकऱ्या पाठविण्याचे टार्गेट देण्यात आले होते.

आज सकाळपासून गावागावातून कागद आणि गाठोडय़ात गुंडाळलेल्या भाकऱ्या येऊ लागल्या आणि पाहता पाहता एक लाख तीन हजार भाकऱ्या गोळा झाल्या. या सगळ्या भाकऱ्या कर्नाळा स्पोर्ट्स क्लबच्या कार्यालयाजवळ एकत्र करण्यात आल्या. त्याचवेळी तेथे साडेपाचशे किलो जवळ्याचे कालवणही तयार करण्यात आले. ते पाच मोठ्या टोपांत भरण्यात आले. तोंडी लावायला कांदा आणि लोणच्याची वेगवेगळी पाकिटे बनविण्यात आली. ही मीठ-भाकर एका ट्रकमधून मुंबईकडे रवाना करण्यात आली. शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांनी यासाठी पुढाकार घेतला होता.

फक्त एका निरोपावर
जवळा-भाकरीच्या या उपक्रमासाठी कोणतीही बैठक झाली नव्हती किंवा आधी काही ठरले नव्हते. आदल्या दिवशी फक्त एक निरोप गावागावात पाठवण्यात आला आणि या उपक्रमाला उदंड प्रतिसाद मिळाला. केवळ गावकरीच नव्हे तर शहरी भागातील कॉलनीमधूनही मोठा प्रतिसाद मिळाला. त्यामुळे भाकऱ्यांबरोबर २७ हजार चपात्याही पाठवण्यात आल्या.

आपली प्रतिक्रिया द्या