पुणे : ती त्याला ‘पप्पा’ बोलवायची, मात्र तो हैवान निघाला

1358

कोरोना काळात एकमेकांपासून सुरक्षित अंतर ठेवा असं सांगितलं जात असताना एका हैवानाने लॉकडाऊनचा फायदा उचलत दत्तक मुलीवर लैंगिक अत्याचार केले. ही मुलगी 15 वर्षांची असून तिला एडसची लागण झालेली आहे. धक्कादायक बाब ही आहे की आरोपी एडसग्रस्तांसाठी एक समाजसेवी संस्था चालवतो. ही मुलगी या हैवानाला मायेने ‘पप्पा’ बोलवायची, मात्र त्याने तिच्या निरागसपणाचा फायदा उचलत तिच्यावर अत्याचार केले. पुण्यातील सहकारनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीच्या समाजसेवी संस्थेत काम करणाऱ्या एका सामाजिक कार्यकर्त्याला हा प्रकार कळाला होता, त्यानेच याबाबतची तक्रार पोलिसांत नोंदवली होती.

पीडित मुलगी ही अनाथ होती. 3 वर्षांची असताना तिची आई जग सोडून गेली होती. त्यानंतर तिला एका महिलेने दत्तक घेतले होते. या महिलेने तिला शिक्षणासाठी पंढरपूरच्या आश्रमात ठेवले होते. एडससोबत तिला टीबीचीही लागण झाली होती. तब्येत खालावल्याने आश्रमातून तिच्या आईला (मुलीला दत्तक घेणाऱ्या महिलेला) फोन करून मुलीला उपचारासाठी घरी न्या असं सांगण्यात आलं होतं. त्यानुसार या महिलेच्या पतीने मुलीला पुण्यात आणून ससून रुग्णालयात दाखल केलं होतं. तिची प्रकृती सुधारल्यानंतर त्याने स्वत:च्या सामाजिक संस्थेमध्ये आणून ठेवलं होतं. लॉकडाऊन काळात संस्था रिकामी झाली होती. याचा फायदा घेत आरोपीने या मुलीवर अत्याचार करायला सुरुवात केली.

सामाजिक संस्थेमध्ये एक कार्यकर्ता सोशल डिस्टन्सिंगबाबत सांगण्यासाठी गेला होता. तो जे सांगत होता ते ऐकून पीडित मुलगी पटकन म्हणाली की मी हे करू शकत नाही. याचं कारण विचारलं असता तिने वडील आपल्यासोबत कसे वागतात हे सांगितलं. है ऐकल्यानंतर हादरलेल्या कार्यकर्त्याने तडक पोलीस स्टेशन गाठलं आणि तक्रार नोंदवली. या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. याबाबतचे वृत्त पुणे मिररमध्ये प्रसिद्ध करण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या