त्याची कला कागदातून साकारते

26

>> ऋषिकेश पोतदार, पुणे

पेपरकट्स म्हणजे काय?
‘पेपरकट्स’ म्हणजे एका पातळ कागदावर कटरच्या सहाय्यानं कलाकृती काढण्यात येते. कागद पातळ असल्यामुळे त्यावर फार सावधपणे कलाकृती काढावी लागते. त्यात एकाग्रता फार महत्त्वाची असते. एका लहान चुकीने पूर्ण कलाकृती खराब होऊ शकते. त्यामुळे खूप संयमाने हे चित्र काढावे लागते. अशा प्रकारच्या कलाकृती तयार करण्यासाठी एखादी सोपी कलाकृती असेल तर एका दिवसात तयार होते, पण एखादी किचकट कलाकृती असेल तर साधारण महिनाही लागू शकतो.

लहानपणापासूनच माझा कलेकडे ओढा… सतत काहीतरी नवीन करण्याच्या मी प्रयत्न करायचो… शिक्षण घेतानाच इंटरनेटवर कलाकृती पाहिल्यावर घरीच त्या तयार करुन बघायच्या असा छंदच मला जडला. या छंदासाठी मी इंजिनीअरिंगचं शिक्षणही अर्धवट सोडलं. पुढे ‘पेपर कट आर्ट’ या कलाप्रकारात करीअर करण्याचा निर्णय मी घेतला. कुठल्याही प्रकारचं प्रशिक्षण न घेता फक्त इंटरनेटच्या माध्यमातून हे काम आता मी यशस्वीरीत्या काम करतोय…

पुण्यात बालपण गेलं. त्यामुळे तेथेच भारतीय विद्या भवनात शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर कोथरुडच्या एमआयटी कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगमध्ये प्रवेश घेतला. पण लहानपणापासूनच मला पेपरकट्स या कलेतच रस होता. त्यामुळे ‘इंडियाज् गॉट टॅलेंट’च्या पाचव्या सीझनमध्ये भाग घेतला आणि माझी कला लोकांसमोर आली. लोकांनी माझ्या या कलेचं खूप कौतुक केलं. पण नेमकी त्याचवेळी माझी इंजिनीअरिंगची परीक्षा आडवी आली. मी कलेसाठी परीक्षा सोडली. यामुळे मला माझं अखेरचं वर्ष पूर्ण करता आलं नाही. नंतर या कलेत करीअर करता येईल याची जाणीव झाली. म्हणून यावरच लक्ष केंद्रित केलं.

अनेकांकडून मिळालेल्या प्रोत्साहनामुळे मी इथपर्यंत पोहोचू शकलो. सध्या मी पेपरकट्स आर्टचे लाइव्ह कार्यक्रम करतो. पण ते इव्हेण्ट्स ठरावीक महिन्यांसाठीच असतात. बाकीच्या वेळेत मी ऑर्ड्सं घेतो. आता मी येथेच थांबणार नाही… याच कलेत आणखी काही करता येईल का पाहणार आहे. ही कला इंटिरीअरमध्ये वापरता येईल का याचाही विचार सुरू आहे.

आपली प्रतिक्रिया द्या