पेपरफूटीचा धडा

65

>>पंकजकुमार पाटील

प्रामुख्याने आपल्या इथे दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षा या आयुष्यातील ‘टर्निंग पॉइंट’ म्हणून ओळखल्या जातात. करियरच्या पुढील दिशा याच दोन्ही परीक्षांच्या निकालावरून ठरत असल्याने गेल्या काही वर्षांत या परीक्षांना भलतेच महत्त्व प्राप्त झाल्याचे दिसून येते. सध्या दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षा सुरू आहेत. यापैकी बारावीची परीक्षा सुरू झाल्यापासूनच चर्चेत आली. कारण पहिल्या पेपरच्या एक दिवस आधी अचानक काही विद्यार्थ्यांचे परीक्षा केंद्र बदलल्याने गोंधळ उडाला होता. ही समस्या सुटल्यावर परीक्षा सुरळीत सुरू होईल असे वाटत असतानाच आता ‘पेपरफुटी’च्या घटनेने एकच खळबळ उडवून दिली. बारावीचे एक-दोन नव्हे तर लागोपाठ तीन पेपर सोशल मीडियापैकी ‘व्हॉटस्अ‍ॅपवर’ व्हायरल झाले.
आधी मराठी, त्यानंतर वाणिज्य शाखेचा सेक्रेटरियल प्रॅक्टिस (एस. पी.) आणि त्यानंतर गणिताचा पेपर याच व्हॉटस्अ‍ॅपवर परीक्षेच्या १० ते १५ मिनिटे आधी फुटल्याने राज्य शिक्षण मंडळास चांगलाच हादरा बसता. आतापर्यंत मराठी, एस. पी. या दोन विषयांच्या पेपरफुटीप्रकरणी चौघांना तर गणिताचा विषय व्हायरल झाल्याप्रकरणी एकेक विद्यार्थी व विद्यार्थिनीस पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या सगळ्या प्रकारावर शिक्षणमंत्र्यांनी ‘खोडसाळपणा’चा शिक्का मारलाय. दुसरीकडे ताब्यात घेतलेल्या सर्वच विद्यार्थ्यांची कसून चौकशी झाली पाहिजे. पेपर फुटण्याचे माध्यम ‘व्हॉटस्अ‍ॅप’सारखा सोशल मीडिया असला तरी त्या माध्यमातून हे पेपर मुळात कुणाकडून कशा रीतीने व्हायरल केले गेले हे तपासायला हवे. त्याचबरोबर शिक्षण मंडळास तपासाची जबाबदारी केवळ पोलिसांवर टाकून चालणार नाही. बोर्ड परीक्षांचे पेपर अशा रीतीने अचानक ‘लीक’ होण्यास मंडळाचादेखील ढिसाळपणा तितकाच दिसून येतो. पैशाच्या आमिषापोटी खासगी क्लास मालकांशी मंडळातील कुणा अधिकाऱ्यांची सोयरीक झालीय का, तसेच शिक्षण मंडळातील अन्य अप्रामाणिक कर्मचाऱ्यांचा शोध घेण्याची जबाबदारी मंडळाने निभवायला हवी.
गेल्या काही वर्षांत राज्यात मोठ्या प्रमाणातील कॉपी प्रकरणाच्या घटना उघडकीस आल्यावर भरारी पथके नेमण्यात आली होती. त्याच धर्तीवर आता या पेपरफुटीप्रकरणी कडक उपाययोजना करण्याची गरज आहे. सध्याचे युग माहिती तंत्रज्ञानाचे आहे. त्यातच जो तो हातातील स्मार्टफोनद्वारे ‘स्मार्ट’ बनू पाहतोय. याच स्मार्टफोनमधील व्हॉटस्अ‍ॅप, फेसबुक, ट्विटरसारख्या सोशल साइटसचा जास्त बोलबोला आहे. सोशल मीडियातून चांगले – वाईट पसरवणे हे शेवटी वापरकर्त्यांवर अवलंबून असते. आसपासची नव्हे तर जगाची माहिती आपल्या मुठीतील स्मार्टफोनमधल्या ‘टच’वर आलीय. त्याचाच भाग म्हणून आज प्रभावी समजल्या जाणाऱ्या ‘सोशल मीडिया’चा वापर पेपर फोडण्यासाठी केला गेला आहे. पेपरफुटीचा समावेश सायबर गुन्ह्यामध्ये झाल्यामुळे सायबर सेलसमोरदेखील यातील गुन्हेगारांचा शोध घेणे हे आव्हानात्मक काम असेल

.
खरं तर कॉपी वा पेपरफुटी प्रकरणांचा मेहनती अन् प्रामाणिक विद्यार्थ्यांवर काहीच परिणाम होणारा नसतो. ते त्यांनी केलेल्या अभ्यासाच्या जोरावर परीक्षेत हमखास यश मिळवू शकतात. शिवाय यश मिळवण्यासाठी पेपरफुटीचा आधार घेणारे भविष्यात तग धरतील ही शक्यताच धूसर वाटते. शॉर्टकट आणि गैरमार्गाचा अवलंब करून मिळविलेल्या यशाबद्दल भले ते त्यांची पाठ थोपटून घेतील, परंतु आपले ‘खोटे’ नाणे भविष्यात आणखी तीव्र होत जाणाऱ्या स्पर्धेमध्ये टिकू शकत नाही याची जाणीव वेळीच ठेवायला हवी. एकवेळ परीक्षा देऊन नापास झाले तरी चालेल, पण स्वत:शी अप्रामाणिक राहून यश संपादन करणे निश्चितच घातक असते. पेपरफुटीच्या या प्रकरणातून विद्यार्थ्यांनी हाच धडा घ्यायला हवा.

आपली प्रतिक्रिया द्या