सर्जिकल स्ट्राइकच्या बहाद्दर जवानांना शौर्य पदके

42

नवी दिल्ली – पाकव्याप्त कश्मीरात घुसून सर्जिकल स्ट्राइक करणाऱया १९ बहाद्दर जवानांना शौर्य पुरस्कार देऊन लष्कराने सन्मानित केले आहे. यामध्ये मेजर रोहित सुरी आणि गोरखा रायफल्सचे शहीद हवालदार प्रेमबहाद्दूर यांना कीर्तिचक्र प्रदान करण्यात येणार आहे. तर कश्मीरात पाच दहशतवाद्यांचा खात्मा करणारे सिंधुदुर्ग जिल्हय़ातील शहीद जवान नायक पांडुरंग महादेव गावडे यांना शौर्यचक्र बहाल केले जाणार आहे.

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला बहाद्दर ३९८ जवानांना शौर्य पदके जाहीर करण्यात आली. त्यामध्ये २ कीर्तिचक्र, १२ शौर्यचक्र, ९१ सेना मेडल, २ नौसेना पदक, ४ वायूसेना पदक, २९ परम विशिष्ट सेवा पदक, ५ उत्तम युद्धसेवा पदक, ४१ अतिविशिष्ट सेवा पदक, १४ युद्धसेवा पदक, ३६ सेना पदक, १४ वायूसेना पदकांचा समावेश आहे. त्याचबरोबर सात जणांना तटरक्षक दलातील पदके जाहीर झाले आहेत. उरी येथील दहशतवादी हल्ल्याचा बदला घेताना हिंदुस्थानच्या चार आणि नऊ निमलष्करी दलाच्या विशेष पथकाने पाकव्याप्त कश्मीरात घुसून २८ सप्टेंबर २०१६च्या मध्यरात्री सर्जिकल स्ट्राइक केले. यात पाकिस्तानी दहशतवाद्यांचे अनेक अड्डे उध्वस्त करीत ५०वर दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. ही कामगिरी बजावणाऱया १९ जवानांना शौर्यपदक जाहीर करण्यात आले आहे. कमांडिंग ऑफिसर कर्नल कपिल यादव आणि कर्नल हरप्रीत संधू यांना युद्धसेवा पदक जाहीर केले. सर्जिकल स्ट्राइकमध्ये महत्त्वपूर्ण कामगिरी बजावणारे मेजर रोहित सुरी यांना शांततेच्या काळातील सर्वोच्च किर्तीचक्र जाहीर झाले आहे. गोरखा रायफल्सचे शहीद हवालदार प्रेमबहाद्दूर यांनाही मरणोत्तर कीर्तिचक्र सन्मान दिला जाणार आहे.

अंबोलीतील शहीद जवान पांडुरंग गावडे यांना शौर्यचक्र

२२ मे २०१६ रोजी जम्मू-कश्मीरात कुपवाडा जिल्हय़ातील जंगलामध्ये लपलेल्या दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी ४१ राष्ट्रीय रायफल्सचे जवान धावून गेले. तब्बल नऊ तास चकमक सुरू होती. या जवानांनी पाचही पाकिस्तानी दहशतवाद्यांचा खात्मा केला. या चकमकीत सिंधुदुर्ग जिल्हय़ातील अंबोलीतल्या मुळवंदवाडी या गावचे सुपुत्र पांडुरंग महादेव गावडे हे शहीद झाले. देशरक्षणासाठी अतुलनीय शौर्य गाजवणाऱया या वीराचा मृत्यू सर्वांनाच चटका लावून गेला. शहीद जवान पांडुरंग गावडे यांना मरणोत्तर शौर्यचक्र बहाल केले जाणार आहे. त्याचबरोबर लेफ्टनंट कर्नल रणजितसिंह पवार, मेजर कृष्णन मनोजकुमार यांनाही सेनामेडल जाहीर झाले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या