परळीत गावठी पिस्तुलासह, जिवंत काडतुस जप्त

परळीत एक गावठी पिस्तूलासह जिवंत काडतुस बाळगणाऱ्याला संभाजीनगर पोलिसांनी अटक केली असून या घटनेने खळबळ उडाली आहे. ही कारवाई बसस्थानक परिसरात करण्यात आली.

शुक्रवार सायंकाळी सात वाजता राहुल सुदाम चाळक (वय 30, रा.दर्गा रोड परभणी) हा गावठी पिस्तूल व जिवंत काडतुस घेऊन परळी बस स्थानक परिसरात फिरत होता. याबाबतची माहिती पोलिसांना मिळाल्यावर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्याच्या जवळ गावठी पिस्तुल व एक जिवंत काडतुस आढळून आले.

पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन चौकशी केली असता आरोपीने अनधिकृतरित्या याची खरेदी हिरासिंग प्रेमसिंग जुन्नी फुलेनगर परळी याच्याकडून केल्याची माहिती दिली. सुमारे 15 हजार 500 रुपयांचा ऐवजही पोलिसांनी आरोपीकडून जप्त केला.

या प्रकरणी पोलीस नाईक विष्णु बाजीराव सानप यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई संभाजी पोलीस स्टेशनचे पो.नि. बी.एन.पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून अधिक तपास पो.ह. आर.एम.राठोड हे करीत आहेत. दरम्यान बसस्थानक परिसरात पिस्तुल सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या