
आजचा तरुण राजकारणापासून दूर राहिलेला पहायला मिळतो. मात्र आजच्या काळात राजकारण व समाजकारण यांचा समतोल साधला तरच विकासाचा मार्ग मिळतो. हाच ध्यास मनात ठेवत अनेक ग्राम पंचायत युवकांच्या ताब्यात गेल्या. बीड जिल्ह्यातील (गडदेवाडी ता. परळी) या ठिकाणी हेच चित्र पहायला मिळाले.
इंग्लंड मधील नॉटींगहॅम येथे चार वर्ष कॉम्प्युटर इंजिनिअरींगचे शिक्षण घेतलेल्या सुशांतसिंह पवार याने गडदेवाडीमध्ये ग्रा.पं. निवडणूक लढवली. निवडणूक प्रचंड अटीतटीची झाली. गावातील जनतेनी परिवर्तनाचा चंग बांधल्याने फक्त 1 मताच्या फरकाने ते विजयी झाले.
ग्राम पंचायत निवडणुकीत परळी तालुक्यातील गडदेवाडी या ठिकाणी सुशांतसिंह पवार या युवकाने सात पैकी चार जागा जिंकत गावची पंचायत ताब्यात घेतली. इंग्लंडमध्ये आपले कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचे शिक्षण घेऊन आपल्या जन्मभूमीचे ऋण फेडण्याचा ध्यास घेत सुशांतसिंहने ग्राम पंचायत निवडणूक लढवली आणि जिंकली. त्यांचे वडील हे सेवानिवृत्त आय.ए.एस.अधिकारी आहेत. सर्वदूर असलेल्या परिचय आपल्या गावाच्या कामाला यावा हा ध्यास सदैव मनात घेऊन त्यांचे कार्य सुरू आहे.
मी जगभर फिरलो परंतु माझे गाव आजही विकापासून दुर आहे. उसतोड कामगारांची संख्या जास्त आहे आहेत. गावात आरोग्य उपकेंद्र मंजूर आहे. परंतु जागेअभावी ते बांधले गेले नाही. मी आता स्वत:च्या मालकीची जागा आरोग्य उपकेंद्रासाठी देणार आहे. लहान मुलांची अंगणवाडी गावाच्या बाहेर बांधली गेली आहे. तिचे स्थलांतर गावात करणार आहोत. 2024 पर्यंत सर्वांना घर देण्याचा पंतप्रधानांचा संकल्प आहे. त्याची मी अंमलबजावणी करणार. वृद्ध लोकांना पेन्शन मिळवून देणार. मायभूमीचे ऋण फेडण्यासाठी मी मुंबईतला मोठा व्यवसाय असतानाही गावाकडे आलो आहे, असे सुशांतसिंह यांनी सांगितले.