अस्तित्वात नसलेल्या ‘बेटी बचाव…’ योजनेचे अर्ज भरण्यासाठी पालकांची झुंबड

62

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर

‘बेटी बचाव, बेटी पढाओ’ या योजनेचे अर्ज भरण्यासाठी पालकांची अक्षरशः झुंबड उडत असल्याचे चित्र सध्या संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यात आहे. परंतु अशी कुठलीही योजनाच अस्तित्वात नसल्याचे स्थानिक प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. आतापर्यंत या योजनेसाठीच्या दहा हजारांहून अधिक अर्जांची वैजापूर या एकाच तालुक्यात विक्री झाली आहे.

वैजापूर तालुक्यात ‘बेटी बचाव, बेटी पढाओ’ याच योजनेचा ग्राहक नोंदणी अर्ज भरण्यासाठी ग्रामपंचायत, शाळा, टपाल कार्यालयात दररोज पालकांची झुंबड उडत आहे. या योजनेतून दहा लाख रुपयांचे अनुदान मिळणार असल्याच्या चर्चा आहेत. त्यामुळे सर्वसामान्य आपल्या मुलीला घेऊन तिची संपूर्ण माहिती भरलेला अर्ज भरून दिल्लीला पाठवत आहेत. मात्र अशा प्रकारचा कुठलाही अर्ज मिळत नसून अशी योजनाच अस्तित्वात नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. तालुक्यातील बऱयाच झेरॉक्स सेंटरवर अर्जांची विक्री होत असून त्यासाठी लागणारे इतर कागदपत्रही झेरॉक्स करून देण्यात येत आहेत. अर्जासोबत असलेल्या पाकिटावर भारत सरकार, महिला एवं बालविकास मंत्रालय, शांतिभवन, नवी दिल्ली असा पत्ताही छापण्यात आलेला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या