ठाण्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आई-वडिलांनी चक्क पाच दिवसांचे बाळ एका जोडप्याला 1 लाख 10 हजार रुपयांना विकले आहे. या प्रकरणी पोलिसांनी आई-वडिलांसहीत सहा जणांना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनील उर्फ भोंदू दयाराम गेंड्रे (31) आणि पत्नी श्वेता (27) असे आरोपी आई-वडिलांची नावे आहेत. तर बाळ खरेदी करणाऱ्यांची नावे पौर्णिमा शेळके (32) आणि धरमदास शेळके (45) अशी आहेत. दोन्ही दांपत्य बदलापूरचे रहिवासी आहेत. 22 ऑगस्ट रोजी सुनील आणि श्वेता यांनी आपले बाळ किरण आणि त्यांचा पती प्रमोद इंगळे या दलालांच्या माध्यमातून धरमदास आणि पौर्णिमा शेळके यांना विकले होते. मात्र त्यांनी बाळ दत्तक घेण्यासाठी आवश्यक असणाऱ्या कायदेशीर प्रक्रियेकडे कानाडोळा केला. या प्रकरणाची मानवी तस्करीविरोधी पथकाला (ATS) माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी वेगाने सुत्र हालवत नागपूरचे रहिवासी असणारे दलाल किरण आणि प्रमोद इंगळे या दांपत्याला अटक केली. तसेच अन्य दोन्ही दांपत्यांना सुद्धा ताब्यात घेतले असून एकून सहा जणांना अटक करण्यात आली आहे. या संदर्भात नागपुरातील कळमना पोलीस ठाण्यात बाल न्याय (मुलांची काळजी आणि संरक्षण) कायद्याच्या कलम 75 आणि 81 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.