..आता नाटक करायचंय

>> गणेश आचवल

2023 वर्ष सुरू झाले आणि विविध विषयांवरील मराठी चित्रपट प्रदर्शित झाले. त्यातला सध्या चर्चेत असलेला चित्रपट म्हणजे परेश मोकाशी दिग्दर्शित ‘वाळवी.’ या चित्रपटाला रसिकांचा खूप चांगला प्रतिसाद लाभत आहे. त्यानिमित्ताने परेश मोकाशी यांच्याशी साधलेला संवाद. त्यांनी चांगले नाटक रंगभूमीवर घेऊन येण्याची इच्छा व्यक्त केली.

 ‘वाळवी’ ही संकल्पना कशी आकाराला आली?

याचा एक किस्सा आहे. अनेक वर्षांपूर्वी मधुगंधाच्या मनात एक दृश्य आले होते. ते दृश्य म्हणजे एकमेकांच्या डोक्यावर बंदूक रोखलेले नवरा-बायको. या दृश्यावर काही करता येईल का, अशी चर्चा आमच्या दोघांमध्ये झाली, पण नंतर मी दुसऱया चित्रपटांमध्ये व्यस्त असल्याने हा विषय बाजूला राहिला. मग 2019 साली ‘वाळवी’ची संकल्पना आकाराला येऊ लागली आणि चित्रपटाचे शूटिंग पूर्णसुद्धा झाले. पुढे ‘वाळवी’च्या चित्रपटाचे पोस्ट प्रॉडक्शन सुरू झाले आणि मग 2020 ला लॉकडाऊन झाल्याने सर्व गोष्टीच बदलल्या, मात्र आता नवीन वर्षात ‘वाळवी’ प्रदर्शित झाला आहे.
दिग्दर्शक म्हणून काय वेगळी ट्रीटमेंट चित्रपटाला दिली?
wया चित्रपटाची निर्मिती झी स्टुडिओज आणि मधुगंध कुलकर्णी यांची आहे. पटकथा आणि संवाद मधुगंधा आणि परेश मोकाशी या दोघांनी लिहिले आहेत. दिग्दर्शक म्हणून अमुक अशी ट्रीटमेंट द्या, म्हणून ट्रीटमेंट दिली जात नाही. त्या त्या विषयाप्रमाणे गोष्टी सुचत जातात. ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’ चित्रपट करताना एक वेगळा बाज होता. ‘एलिझाबेथ एकादशी’च्या वेळी गल्ल्यांमध्ये शूटिंग करायचे होते, तर इथे ‘वाळवी’चा जॉनर वेगळा होता, त्यानुसार गोष्टी घडत गेल्या, कल्पना सुचत गेल्या.

  या चित्रपटाचा उल्लेख ‘रहास्यमय चित्रपट’ असा केला जातो…

जेव्हा चित्रपट निर्माण झाला, तेव्हा याचे वर्णन कसे करता येईल, तर मग यात रहस्य आहे आणि विनोददेखील आहे. म्हणजे हा थ्रिलर आणि कॉमेडी अशा दोन्हींचे मिश्रण आहे. म्हणून ‘थ्रिलकॉम’ हा इंग्रजी शब्द आणि मराङ्गीत ‘रहस्य आणि हास्य’ या शब्दांतून मग ‘रहास्यमय’ अशी संज्ञा मी निर्माण केली आणि तो शब्दसुद्धा सर्वांना आवडला. लोक चित्रपट बघतात आणि मग इतरांनाही तो बघा असे सांगतात, प्रेक्षक आपला चित्रपट अधिकाधिक लोकांपर्यंत पोचवत असतात, यावर माझा विश्वास आहे.

  आता नवीन काय…
लोकांना वेगळय़ा विषयांवरचे चित्रपट आवडत असतात आणि ते लोक आवर्जून चित्रपट गृहात जाऊन त्या चित्रपटाचा आनंद घेतात. ‘वाळवी’च्या बाबतीत हे दिसून येत आहे. सध्या एका हिंदी चित्रपटाची जुळवाजुळव सुरू आहे. तसेच एक मराङ्गी नाटक पूर्ण लिहून तयार आहे. वेळ मिळाला की, भविष्यात चांगले नाटक करण्याचीदेखील इच्छा आहे.