Parineeti-Raghav wedding – लग्नघटिका आली, पण परिणीती-राघवने पाहुण्यांना ‘नो फोन’ पॉलिसीची अट घातली

अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आपचे खासदार राघव चड्ढा यांची सध्या लगीनघाई सुरु आहे. 24 सप्टेंबरला उदयपूरमध्ये दोघं विवाहबंधनात अडकणार आहेत. अशातच दोघही आपलं लग्न खासगीत ठेवणार असून लग्नात पाहुण्यांना नो फोन पॉलीसीची अट घातली आहे.

अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांच्या लग्नाचे प्री वेडिंग फंक्शन सुरु झाले आहेत. दिल्लीत अरदास, कीर्तन आणि सुफी नाईटचा आनंद घेतल्यानंतर जोडपं आज उदयपूरला रवाना होणार आहे. 23 सप्टेंबरला लग्नात सहभागी होणारे पाहुणेही उदयपूरला पोहोचणार आहेत. मात्र या सर्व पाहुण्यांना वधू-वराकडून एक अट घालण्यात आली आहे.  इंडिया टूडेच्या वृत्तानुसार, परिणीती-राघव यांच्या लग्नाला उपस्थित राहणाऱ्या पाहुण्यांना नो फोन पॉलिसीला फॉलो करावे लागेल. सूत्रांच्या माहितीनुसार, हे जोडपं त्यांचे लग्न खासगी ठेऊ इच्छित आहेत.

या लग्नात कुटुंबातील जवळच्या नातेवाईकांची उपस्थिती असणार आहे. हा लग्नसोहळा खासगीस्वरुपात असणार आहे. याआधी कटरीना-विक्की, कियारा-सिद्धार्थ या बॉलीवूड सेलेब्सनी त्यांच्या लग्नात नो फोन पॉलीसी फॉलो केली होती. त्यांनी आपले लग्न खासगी ठेवले होते.

लग्नाच्या दिवशी परिणीती चोप्रा मनिष मल्होत्राने डिझाईन केलेला ड्रेस घालणार आहे. तर राघव चड्ढा डिझायनर पवन सचदेवा याने डिझाईन केलेला वेडिंग आऊटफिट घालणार आहे. राघव आणि परिणीती यांच्या लग्नात राजकारण आणि मनोरंजन क्षेत्रातील प्रसिद्ध लोकं सहभागी होणार आहेत. 30 सप्टेंबरला वेडिंग रिसेप्शन होणार आहे. मे महिन्यात दोघांचा साखरपूडा झाला होता. मैत्रीने सुरु झालेले नाते लग्नात बदलणार आहे.