फेंच ओपन टेनिस स्पर्धा – बार्बोरा, मारिया पहिल्यांदाच उपांत्य फेरीत

फ्रेंच ओपन या टेनिस स्पर्धेतील महिला गटात नवा ग्रॅण्डस्लॅम चॅम्पियन मिळणार हे बुधवारी निश्चित झाले आहे. ग्रीसच्या मारिया सक्कारी हिने गतविजेत्या इगा स्विअतेकला पराभूत करीत अंतिम चारमध्ये प्रवेश केला. झेक प्रजासत्ताकच्या बार्बोरा व्रेझिकोवा हिने कोको गॉफला सरळ दोन सेटमध्ये हरवत सेमीफायनलमध्ये एण्ट्री मारली. या दोन्ही टेनिसपटूंना पहिल्यांदाच ग्रॅण्डस्लॅमची उपांत्य फेरी गाठता आलेली आहे. तसेच महिला गटात अंतिम चारमध्ये पोहोचलेल्या एकाही खेळाडूला अद्याप ग्रॅण्डस्लॅम जिंकता आलेले नाही. त्यामुळे यंदा फ्रेंच ओपन या मानाच्या ग्रॅण्डस्लॅमला नवी राणी मिळेल हे पक्के झाले आहे.

बिनसिडेड खेळाडूची झेप

बिनसिडेड टेनिसपटू बार्बोरा व्रेझिकोवा हिने उपांत्यपूर्व फेरीत कोको गॉफला 7-6, 6-3 असे नमवत पुढे पाऊल टाकले. झेक प्रजासत्ताकच्या महिला टेनिसपटूला 1981 सालानंतर ही ग्रॅण्डस्लॅम स्पर्धा जिंकता आलेली नाही. हना मांदलीकोवा हिने 1981 साली ही स्पर्धा जिंकली होती. आता बार्बोरा व्रेझिकोवा हिच्या खेळाकडे साऱयांच्या नजरा असणार आहेत.

आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी

मारिया सक्कारी या ग्रीसच्या 25 वर्षीय टेनिसपटूने बुधवारी इगा स्विअतेकला 6-4, 6-4 असे हरवले. मारिया सक्कारी हिची ग्रॅण्डस्लॅममधील ही सर्वोत्तम कामगिरी ठरली हे विशेष. या लढतीत मारिया सक्कारी हिने पाच एसेस मारले. तसेच या लढतीत दोन्ही खेळाडूंनी प्रत्येकी दोन दुहेरी चुका केल्या. आता मारिया सक्कारी व बार्बोरा व्रेझिकोवा यांच्यात महिला एकेरीची उपांत्य लढत रंगणार आहे.

अनास्तासिया भिडणार तमाराला

महिला एकेरीची अन्य उपांत्य लढत अनास्तासिया पावल्युचेनकोवा व तमारा झिदानसेक या दोन महिला खेळाडूंमध्ये असणार आहे. ही लढत उद्या रंगेल. रशियाची 29 वर्षीय अनास्तासिया पावल्युचेनकोवा व स्लोवेनियाची 23 वर्षीय तमारा झिदानसेक या दोन्ही खेळाडूंना पहिल्यांदाच ग्रॅण्डस्लॅमची उपांत्य फेरी गाठता आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या