‘जो जिता वही सिकंदर…’ हिंदुस्थानच्या हॉकी संघाने आज हे खरे करून दाखवले. 1972 पासून ऑलिम्पिक स्पर्धेत बलाढय़ ऑस्ट्रेलियाला हरवता आले नव्हते. अखेर 52 वर्षांनंतर हिंदुस्थानच्या हॉकी संघाने तो पराक्रम केला. अत्यंत चुरशीच्या झालेल्या सामन्यात हिंदुस्थानकडे 2-0 अशी जबरदस्त आघाडी होती. पण शेवटच्या क्षणी ही आघाडी मोडून काढण्यासाठी ऑस्ट्रेलिया आपली सर्व ताकद लावली, पण हिंदुस्थानच्या बचावफळीने ऑस्ट्रेलियन आक्रमकांना रोखत आपला उपांत्यपूर्व फेरीतला प्रवेश निश्चित केला.
टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक पटकावणाऱ्या हॉकी संघाकडून पुन्हा एकदा पदकाची अपेक्षा आहे. गुरुवारी बेल्जियमविरुद्ध हार सहन करावी लागल्यामुळे हॉकी संघ निराश दिसत होता, मात्र आज त्यांनी ऑस्ट्रेलियावर मात करत आपला पदकाचा दावा मजबूत केला. या स्पर्धेत हिंदुस्थानने आयर्लंडचा 2-0 असा पराभव करत दणक्यात सुरुवात केली, मात्र अर्जेंटिनाविरुद्ध 1-1 अशी बरोबरी राखल्यामुळे हिंदुस्थान काहीसा मागे पडला होता. मात्र मग आयर्लंडविरुद्ध विजय नोंदवत हिंदुस्थान गटात वर आला. पण बेल्जियमविरुद्ध झालेल्या पराभवामुळे पेटून उठलेल्या हिंदुस्थानने ऑस्ट्रेलियाला हरवत आपले मनोधैर्य उंचावले आहे. आता उपांत्यपूर्व लढत जिंकून हिंदुस्थानचा संघ आपली पदकाच्या दिशेने आगेकूच करील.
आज बलाढय़ ऑस्ट्रेलियाचे हिंदुस्थानविरुद्ध पारडे जड मानले जात होते, मात्र हिंदुस्थानी खेळाडूंनी हे खोटे करून दाखवून दिले. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचेच पारडे जड समजले जात होते, मात्र सुरुवातीपासूनच हिंदुस्थानने सामन्यावर पकड मजबूत केली होती. कांगारूंच्या आक्रमक खेळीला हिंदुस्थानच्या बचावफळीने कडवी झुंज दिली. पाचव्या मिनिटाला व्रेग थॉमसचा गोलप्रयत्न श्रीजेशने हाणून पाडला. बाराव्या मिनिटापर्यंत ऑस्ट्रेलियन्सचे 3-4 गोलसाठीचे प्रयत्न रोखण्यात श्रीजेशला यश आले होते. 12 व्या मिनिटाला हिंदुस्थाननेदेखील ऑस्ट्रेलियावर हल्ला चढवला. ललित उपाध्यायचा गोलच्या दिशेने जाणारा चेंडू ऑसी गोलरक्षकाने रोखला, परंतु चेंडू रिबाऊंडमध्ये अभिषेककडे गेला आणि त्याने गोल करून हिंदुस्थानला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. पुढच्याच मिनिटाला हरमनप्रीत सिंगने पेनल्टी कॉर्नरवर भन्नाट गोल करून हिंदुस्थानची आघाडी 2-0 अशी मजबूत केली.
तिसऱया क्वार्टरमध्ये ऑस्ट्रेलियाचे पुनरागमनाचे सर्व प्रयत्न हिंदुस्थानने हाणून पाडले. 32 व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टी स्ट्रोकवर हरमनप्रीतने आणखी एक गोल करून हिंदुस्थानची आघाडी 3-1 ने मजबूत केली. 41 व्या मिनिटाला ऑसी खेळाडूंनी चांगली रणनीती आखताना गोलसाठी संधी निर्माण केली होती, परंतु शेवटच्या क्षणाला त्यांचा ताळमेळ चुकला. 53 व्या मिनिटाला अभिषेकने केलेला गोल ग्राह्य धरला गेला नाही. 55 व्या मिनिटाला ऑस्ट्रेलियाला स्ट्रोक मिळाला आणि ब्लॅक गोव्हर्सने गोल करून पिछाडी 2-3 अशी कमी केली. शेवटच्या पाच मिनिटांत ऑस्ट्रेलियाने पुनरागमनासाठी जोरदार प्रयत्न केले, पण त्यांना यश मिळवता आले नाही. त्यामुळे हिंदुस्थानने हा सामना 3-2 असा जिंकला.
हिंदुस्थान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ‘ब’ गटातील साखळी सामना खेळला गेला. हिंदुस्थानने उपांत्यपूर्व फेरीतील स्थान आधीच पक्के केले असले तरी गटातील स्थान या लढतीपूर्वी निश्चित नव्हते. त्यांना उपांत्यपूर्व फेरीत नेदरलँड्स, जर्मनी आणि ग्रेट ब्रिटन यांच्यापैकी एकाशी भिडावे लागेल.
भक्कम बचाव…
हिंदुस्थानने घेतलेल्या आघाडीमुळे जिव्हारी लागलेल्या ऑस्ट्रेलियाकडून जबरदस्त आक्रमण करण्यात येत होते. दुसऱया क्वार्टरच्या पहिल्या 10 मिनिटांत त्यांनी हिंदुस्थानच्या बचावफळीचा कस काढला. 25 व्या मिनिटाला मनप्रीतने गोलजवळ जाणारा चेंडू रोखला, मात्र पंचांनी ऑस्ट्रेलियाला पेनल्टी कॉर्नर दिला. ऑसी खेळाडूचा शॉट चुकला होता, परंतु त्यांनी सांघिक खेळ करून पहिला गोल मिळवला. ऑस्ट्रेलिया यांच्या झालेल्या सामन्यात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा 3-2 ने पराभूत करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.