दोन्ही गेममध्ये आघाडी घेऊनही लक्ष्य सेनला बॅडमिंटनच्या अंतिम फेरीचे लक्ष्य गाठता आले नाही. डेन्मार्कच्या गतविजेत्या व्हिक्टर अॅलेक्ससनच्या रॉकेटसारख्या सुसाट फोरहॅण्डसमोर लक्ष्य सेनचा खेळ अत्यंत सामान्य भासला आणि उपांत्य फेरीच्या सामन्यात व्हिक्टरनेच सेनच्या खेळाला 22-20, 21-14 असे लक्ष्य केले. व्हिक्टरचा खेळ सुवर्णपदक विजेत्याला असा साजेसाच होता आणि तो त्याच थाटात अंतिम फेरीत पोहोचला. हिंदुस्थानला बॅडमिंटनमध्ये पहिलेवहिले सुवर्ण जिंकून देण्याचे स्वप्न भंगल्यानंतर आता लक्ष्य सेन सोमवारी कांस्य पदकासाठी झी जिआ लीशी भिडेल.
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये बॅडमिंटनमध्ये हिंदुस्थानला सर्वांच्या नजरा लक्ष्य सेनवर होत्या. आज त्याच्यापुढे डेन्मार्कच्या व्हिक्टर अॅलेक्ससेनचे कडवे आव्हान होते. पण या सामन्यात लक्ष्यने जोरदार सुरुवात करताना पहिले तीन गुण घेत व्हिक्टरवर दबाव आणला. पण त्यानंतर व्हिक्टरने पहिला गुण घेत आपलीही जोरदार सुरुवात केली. लक्ष्यने कल्पक खेळ करत व्हिक्टरच्या वेगवान खेळाला रोखत 18-13 अशी आघाडी घेत पहिला गेमवर आपले वर्चस्व राखले होते, पण त्यानंतरही व्हिक्टरने आपल्या वेगवान खेळाने लक्ष्यला भंडावून सोडत सामन्यात पुनरागमन केले. तरीही लक्ष्य 20-17 असा गेमपॉइंटवर होता आणि व्हिक्टरने झंझावाती खेळाचे पुन्हा दर्शन घडवत सलग पाच गुण घेत 22-20 अशी बाजी मारली.
व्हिक्टरपुढे लक्ष्य निष्प्रभ
दुसऱ्या गेममध्ये लक्ष्य सेनकडे 7-0 अशी जबरदस्त आघाडी होती. पण व्हिक्टरने पुन्हा डोके वर काढत जबरदस्त रॅली करत मध्येच लक्ष्यवर रॉकेटगती हल्ले चढवले. व्हिक्टरच्या अनेक वेगवान फोरहॅण्डचे लक्ष्यकडे उत्तरच नव्हते. दुसऱ्या डावातही अनेकदा लक्ष्यकडेच आघाडी होती. पण सामन्यात खेळ व्हिक्टरचाच दिसून आला. 12-12 अशा बरोबरीनंतर प्रथमच व्हिक्टरने आघाडी घेतली ती शेवटपर्यंत कायम राखली. पहिला गेम 29 मिनिटे तर दुसरा गेम 24 मिनिटांत व्हिक्टरने आपल्या ताब्यात घेतला. व्हिक्टरने लक्ष्यविरुद्ध आपला दबदबा कायम राखताना दहापैकी नववा विजय नोंदविला. आता सुवर्ण पदकासाठी त्याला थायलंडच्या कुणलावुत वितीदसार्नशी भिडावे लागणार आहे.
लक्ष्यला कांस्यपदकाची संधी
लक्ष्य सेनचे सुवर्णपदक हुकले असले तरी आता त्याला कांस्यपदक जिंकून नवा इतिहास रचण्याची संधी आहे. हिंदुस्थानी बॅडमिंटनच्या इतिहासात अद्याप एकाही पुरुष बॅडमिंटनपटूने ऑलिम्पिक पदक जिंकलेले नाही. सोमवारी इंडोनेशियाच्या झी जिआ लीविरुद्ध विजय नोंदवत लक्ष्यला आपले कांस्य पदकाचे लक्ष्य गाठता येऊ शकते. आजवर बॅडमिंटनमध्ये सिंधूनेच दोन पदके जिंकली आहेत. लक्ष्यला कांस्य जिंकून हिंदुस्थानची पदक संख्या वाढवण्याची संधी मिळाली आहे.
लक्ष्य सेन भावी विजेता
लक्ष्य सेन हा बॅडमिंटन जगतातील एक जबरदस्त खेळाडू आहे. त्याने मला चांगलेच झुंजवले. त्याचे भवितव्य फारच उज्ज्वल असून तो आपल्या देशासाठी भविष्यात नक्कीच सुवर्ण जिंकेल, असा विश्वास व्हिक्टर अॅलेक्ससनने बोलून दाखवत लक्ष्यच्या खेळाचे मनापासून कौतुक केले.