ऑलिम्पिकच्या इतिहासात पाकिस्तानला पहिले सुवर्णपदक जिंपून देणारा भालाफेकपटू अर्शद नदीम मायदेशी परतला. मात्र, या ऐतिहासिक कामगिरीनंतरही पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी अर्शदची तीन लाख रुपयांचे बक्षीस देऊन बोळवण केली. त्यामुळे माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू दानिश कनेरिया आपल्या पंतप्रधानांवर कमालीचा संतापला. हे तीन लाखत अर्शदला विमानाच्या तिकिटासाठी तरी पुरतील का? असा संतप्त सवालही त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून विचारला.
पाकिस्तानी पंतप्रधानांनी अर्शद नदीमला दिलेल्या तीन लाख रुपयांच्या धनादेशाचा पह्टो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा फोटो पाहिल्यानंतर माजी पाकिस्तानी क्रिकेटर दानिश कनेरिया पंतप्रधानांवर चांगलाच संतापला आहे. त्याने पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या एक्सवर ट्विट करत लिहिले, ‘माननीय पंतप्रधान, पृपया किमान विनम्र अभिनंदन करा. तुम्ही दिलेला लाखो रुपयांच्या धनादेशाचा फोटो डिलीट करा. ही रक्कम अर्शदच्या गरजांसमोर काहीच नाही. ही रक्कम इतकी कमी आहे की त्याला विमानाचे तिकीटही काढू शकत नाही. त्यामुळे अर्शदच्या सततच्या संघर्षाचा विचार करता हा त्याचा आणि देशाचा अपमान आहे.’