पॅरिस पॅरालिम्पिकच्या चौथ्या दिवशी हिंदुस्थानला एकच पदक जिंकता आले असले तरी दोन बॅडमिंटनपटूंनी अंतिम फेरी गाठत हिंदुस्थानची दोन पदके निश्चित केली आहेत. एवढेच नव्हे तर बॅडमिंटनपटूंच्या जोरदार कामगिरीमुळे हिंदुस्थानला सोमवारी पाच पदके जिंकण्याची जबरदस्त संधी लाभणार आहे. त्यात दोन कांस्य पदकांसह एक रौप्य पदकासाठी बॅडमिंटनपटू भिडेल.
आज बॅडमिंटनपटू सुहास यथिराजने आपल्याच देशाच्या सुकांत कदमला उपांत्य सामन्यात 21-17, 21-12 असे नमवत पुरूष बॅडमिंटनच्या एसएल 4 या प्रकाराची अंतिम फेरी गाठली. त्यामुळे सुहास आता सुवर्ण पदकासाठी फ्रान्सच्या लुकास मझूरशी भिडेल. तसेच एसएल 3 प्रकारात नितेश कुमारनेही अंतिम फेरी गाठली असून त्याला सुवर्ण जिंकण्यासाठी ब्रिटनच्या डॅनियल बेथेलशी झुंज द्यावी लागेल. त्याचप्रमाणे उपांत्य फेरी पराभूत सुकांत कदम कांस्य पदकासाठी इंडोनेशियन फ्रेडी सेतिआवानशी भिडेल.
उपांत्य लढतीत हिंदुस्थानच्या बॅडमिंटनपटू आमने–सामने
मनीषा रामदास हिने महिलांच्या बॅडमिंटन एसयू-5 प्रकारात उपांत्यपूर्व लढतीत जपानच्या मामिको टोयोडा हिचा 21-13, 21-16 असा पराभव करीत उपांत्य फेरी गाठली. आता उपांत्य लढतीत तिची लढत आपल्याच देशाच्या तुलसीमती मुरुगेसन हिच्याशी पडेल. त्याचप्रमाणे महिला एकेरीच्या एसएच 6 प्रकारात सुमथी सिवनने उपांत्य फेरीत स्थान मिळवले असून ती अंतिम फेरी गाठण्यासाठी चीनच्या शुआनबाओ लिनशी भिडेल.
मनीषा रामदासची उपांत्य लढती हिंदुस्थानी खेळाडूशीच असल्याने देशाचे आणखी एक पदक नक्की झाले आहे. तुलसीमतीने शनिवारी ‘अ’ गटातील उपांत्यपूर्व लढतीत पोर्तुगालच्या बीट्रिज मोंटेइरो हिचा पराभव करीत आगेकूच केली होती. आता मनीषा-तुलसीमती यांच्या लढतीतील विजेती खेळाडू सुवर्ण पदकासाठी झुंजेल, तर पराभूत खेळाडू कांस्य पदक जिंकण्यासाठी प्रयत्न करेल.
मनदीप कौर, पलक कोहलीचे आव्हान संपुष्टात
एसएल-3 गटात हिंदुस्थानची मनदीप कौर ही तृतीय मानांकित नायजेरियाच्या बोलाजी मरियम एनियोला हिच्यापुढे निप्रभ ठरली. नायजेरियन खेळाडूने ही लढत 21-8, 21-9 अशी अवघ्या 23 मिनिटांत जिंकली. गटफेरीत मनदीपला एनियोलाने हरविले होते. दुसरीकडे एसएल-4 गटात पॅरा जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील कांस्य पदक विजेत्या पलक कोहलीचेही पॅरिस पॅरालिम्पिकमधील आव्हान संपुष्टात आले. तिला इंडोनेशियाच्या खलीमातुस सादियाह हिने 28 मिनिटांपर्यंत रंगलेल्या लढतीत 21-19, 21-15 असे पराभूत केले.
अवनी–सिद्धार्थ जोडीकडून निराशा
यंदाच्या पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये सुवर्ण पदकाने हिंदुस्थानचे पदकतक्त्यात खाते उघडणारी नेमबाज अवनी लेखरा व तिचा साथीदार सिद्धार्थ बाबू या जोडीने रविवारी निराशा केली. एसएच-1 गटातील महिलांच्या 10 मीटर एअर रायफल प्रोन प्रकारात या हिंदुस्थानी जोडीला अंतिम फेरी गाठण्यात अपयश आले. पात्रता फेरीत अवनी 628.8 गुणांसह 11 व्या स्थानी राहिली, तर सिद्धार्थ 628.3 गुणांसह 28 व्या स्थानावर फेकला गेला.
नितेश कुमार अंतिम फेरीत
हिंदुस्थानी बॅडमिंटनपटू नितेश कुमारने जपानच्या डाइसुके फुजिहारा याचा पराभव करीत पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत अंतिम फेरीत धडक दिली. नितेशने एसएल-3 गटातील उपांत्य फेरीत जपानी खेळाडूचा 21-16, 21-12 असा सहज पराभव केला. आता सुवर्ण पदकाच्या लढतीत अव्वल मानांकित नितेशची गाठ द्वितीय मानांकित ब्रिटनच्या डॅनिरल बेथेल याच्याशी पडणार आहे. तसेच एसएच 6 मध्ये हिंदुस्थानची शिवराजन सोलाईमलाई आणि सुमथी सिवन या दोघी कांस्य पदकासाठी इंडोनेशियन सुभान-मार्लिना जोडीविरुद्ध खेळणार आहेत. त्यामुळे बॅडमिंटनमध्ये हिंदुस्थानवर एकाच वेळी पाच पदकांचा वर्षाव होऊ शकतो.
प्रीति पालला दुसरे कांस्य 200 मीटर शर्यतही जिंकली
100 मीटर शर्यतीत कांस्य जिंकणाऱ्या धावपटू प्रीति पालने 200 मीटर टी 35 शर्यतीत कांस्य पदक जिंकत आपल्या दुसऱ्या पदकाची कमाई केली. तिने 30.01 सेकंदात शर्यत पूर्ण करत पदकावर आपले नाव कोरले. चीनच्या झिया झोऊ आणि क्वियानक्वियान गुओ यांनी सुवर्ण आणि रौप्य पदक पटकावले.