हिंदुस्थानची पदक बचाव मोहीम वेगात, अवनीपाठोपाठ सुमितनेही सुवर्ण राखले

बॅडमिंटनमध्ये हिंदुस्थानच्या तीन-तीन खेळाडूंनी अंतिम फेरी गाठली होती, पण नितेश कुमारचा अपवाद वगळता अन्य दोघांना सोनेरी यश मिळवता आले नाही. मात्र अॅथलेटिक्समध्ये भालाफेकीत सुमित अंतिलने विक्रमी कामगिरीसह सुवर्ण किमया साधली. नेमबाज अवनी लेखरापाठोपाठ सुवर्ण पदक राखणारा सुमित दुसराच खेळाडू ठरला आहे. तसेच सुहास अथिराज, योगेश कथुनिया, निशाद कुमार यांनीही टोकियो पॅरालिम्पिकमधील पदक कामगिरीची पुनरावृत्ती केली आहे.

पदक बचाव आणि बढाव

अवनी लेखराने 10 मीटर एअर रायफलमध्ये सोनेरी कामगिरी करत पराक्रम केला. ती टोकियोतही याच श्रेणीत सुवर्ण विजेती ठरली होती तर पॅरिसमध्येही तिने तीच किमया साधली. पॅरालिम्पिकमध्ये आपले सुवर्ण राखणारी ती पहिलीच अॅथलीट होती, पण पाचव्या दिवशी सुमित अंतिलने भालाफेकीत त्याच पराक्रमाची पुनरावृत्ती केली. टोकियोतही त्याने सोने जिंकले होते आणि यंदाही त्याने स्वताचाच विक्रम मोडत तिच किमया साधली. बॅडमिंटनमध्ये सुहास अथिराजने तेच यश मिळवले. गेल्या वेळीही त्याचे सुवर्ण हुकले होते आणि यावेळीही त्याला रौप्यवरच समाधान मानावे लागले. निशाद कुमार आणि योगेश कथुनिया दोघांनीही टोकियो पॅरालिम्पिकची रौप्य कामगिरी पॅरिसमध्येही साकारली. मात्र टोकियोत 50 मीटर एअर पिस्टल प्रकारात सुवर्ण जिंकणार्या मनीष नरवालने यंदा 10 मीटर एअर पिस्टल प्रकारात रौप्य जिंकले आहे. टोकियोत पदक जिंकणारे अनेक खेळाडू पॅरिसमध्येही पदक राखत असल्यामुळे हिंदुस्थानची पदक संख्या चांगलीच वाढणार हे निश्चित आहे.

पॅरालिम्पिकमध्ये पदक वर्षाव

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये हिंदुस्थानच्या 117 खेळाडूंच्या पथकाला केवळ सहा पदकेच जिंकता आली होती. मात्र पॅरालिम्पिकमध्ये हिंदुस्थानी खेळाडू आपली सर्वोत्तम आणि ऐतिहासिक कामगिरी करणार, याचे संकेत आधीच मिळाले होते आणि आता ते प्रत्यक्षात साकारले जात आहे. गेल्या ऑलिम्पिकमध्ये हिंदुस्थाने पाच सुवर्णांसह 19 पदके जिंकली होती. आता हिंदुस्थानच्या खेळाडूंनी स्पर्धेच्या पाचव्या दिवशी पदकांचा वर्षाव करताना चक्क आठ पदके जिंकण्याचा पराक्रम केला. हिंदुस्थानी ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक स्पर्धांच्या इतिहास इतकी पदके कधीही जिंकता आली नव्हती. आठ पदकांमध्ये नितेश पुमार आणि सुमित अंतिलच्या सुवर्ण पदकाचाही समावेश आहे.

नवा इतिहास रचणार

हिंदुस्थानचे 84 खेळाडूंचे पॅरालिम्पिक पथक  टोकियामध्ये केलेल्या 19 पदकांच्या विक्रमाला मागे टापून नवा इतिहास रचण्याच्या मार्गावर आहे. पाच दिवसांतच 15 पदकांपर्यंत झेप घेणारे हिंदुस्थानचे पथक सहजगत्या पदकांचा ऐतिहासिक रौप्य महोत्सव साजरा करतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. एवढेच नव्हे तर हिंदुस्थान पाच पेक्षा अधिक सोनेरी यशही मिळवणार, हेसुद्धा पक्के मानले जात आहे. सोमवारीच हिंदुस्थानचे बॅडमिंटनमध्ये दोन सुवर्ण हुकले होते. अन्यथा हिंदुस्थानने पाचव्याच दिवशी पाच सुवर्णांचा टप्पा गाठला असता.