पार्लेश्वर व्यायामशाळेचे खेळाडू हुश्शार, राष्ट्रीय मल्लखांब स्पर्धेत घवघवीत यश

मध्य प्रदेश उज्जैन येथे या वर्षी झालेल्या राष्ट्रीय मल्लखांब स्पर्धेत श्री पार्लेश्वर व्यायामशाळेतील खेळाडूंनी वर्चस्व गाजवले. या व्यायामशाळेतील आठ खेळाडूंनी जबरदस्त कामगिरी केली अन् महाराष्ट्राला 15 पदकांवर मोहोर उमटवता आली. श्री पार्लेश्वर व्यायामशाळेचे प्रशिक्षक गणेश  देवरुखकर  यांच्या मोलाच्या मार्गदर्शनामुळेच हे घवघवीत यश संपादन करता आले आहे.

कोरोनानंतरच्या या पहिल्याच स्पर्धेत  राज्यस्तरीय स्पर्धेसाठी एकूण 13 खेळाडूंची निवड झाली. एकाच दिवशी चार वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत खेळाडूंनी कमी वेळेत आपले जास्तीत जास्त चांगले कौशल्य दाखवले. त्यातीलच आठ खेळाडूंची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आणि ते आठवडाभरातच राष्ट्रीय स्पर्धेसाठी उज्जैनला रवाना झाले. या आठ खेळाडूंनी वैयक्तिक सात पदके आणि सांघिक आठ पदके अशी एकूण 15 पदकांची लयलूट केली आणि श्री पार्लेश्वर व्यायामशाळेचे नाव उज्ज्वल केले.

तनश्री जाधव हिने 14 वर्षांखालील मुलींच्या गटात पुरलेल्या मल्लखांबात सुवर्णपदक, दोरी मल्लखांबात रौप्यपदक आणि वैयक्तिकदेखील रौप्यपदक पटकावले तसेच सांघिक सुवर्णपदक असे एकूण चार पदके पटकावली. रिषभ घुबडे याने 18 वर्षांखालील गटात पुरलेल्या मल्लखांबात कास्यपदक तसेच दोरी मल्लखांबात कास्यपदक तर सांघिक रौप्यपदक अशी एकूण तीन पदके पटकावली. सोहम शिवगण यानेदेखील 14 वर्षांखालील गटात वैयक्तिक विजेतेपदात कास्यपदक तसेच सांघिक कास्यपदक पटकावले आहे. आदी वायंगणकर याने 14 वर्षांखालील गटात पुरलेल्या मल्लखांबात वैयक्तिक कास्यपदक आणि सांघिक विजेतेपदामध्येदेखील कास्यपदक पटकावले.

आपली प्रतिक्रिया द्या