परळीत स्टेट बँक ऑफ इंडियाचे 5 कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह; आठ दिवस शहरात संचारबंदी लागू

लॉक डाऊन मध्ये सोशल डिस्टंसिंग चे नियम काटेकोरपणे पाळणारी स्टेट बँक ऑफ इंडियाचे आता अनलॉक मध्ये मात्र कोरोनाच्या विळख्यात सापडताना दिसत आहे. परळीतील राणी लक्ष्मीबाई टॉवर जवळ असलेल्या शाखेच्या 5 कर्मचाऱ्यांचे स्वॉब तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. शनिवारी सगळ्याच म्हणजे पाचही कर्मचाऱ्यांची चाचणी पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. याआधी परळीत 3 कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले होते.आज बीड जिल्ह्यातील 251स्वॉब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते.

मुख्य शाखेतील कर्मचाऱ्यांना गुरुवारपासूनच अस्वस्थ वाटल्याने त्यांना शुक्रवारी बँकेत कुठलेही काम करू दिले नाही. तसेच त्यांचे स्वॉब तपासणीसाठी पाठवण्यात आले. बी-बीयांनाच्या खरेदीसाठी पैसे काढणे व पीक कर्जासाठी ग्रामीण भागातील नागरिकांची या बँकेत मोठी रेलचेल असते यामुळे इथे संपर्कामुळे होणाऱ्या संसर्गाचा धोका अधिक आहे.या कर्मचाऱ्याच्या संपर्कात आलेल्यांची यादीही लांबलचक असल्याची शक्यता नाकारता येत नाही.

परळी शहरात लॉक डाऊन चे पालन नागरिकांकडून होत नसल्याने संसर्गाचा धोका वाढला आहे.अनेक ठिकाणी नागरिक मास्क न लावताच फिरतांना दिसून येत आहे.बाजार समितीच्या इमारतीजवळ फळ विक्रेते मास्कशिवाय फिरतांना दिसून येत आहेत.तसेच शहरातील काही कपड्याचे बडे व्यापारीही प्रशासनाने ठरवून दिलेल्या वेळेपेक्षा अधिक काळ दुकाने उघडे ठेवत आहेत.या दुकानात होणारी गर्दीही जास्त असल्याने यावर कडक कारवाई होणे गरजेचे झाले आहे.

आठ दिवसासाठी परळी शहरात संचारबंदी लागू ; तालुक्यातील १६ गावात कंटेनमेंट झोन

शनिवारी परळी शहरातील एसबीआय बँकेतील पाच कर्मचारी कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले. या कर्मचाऱ्यांचा बँकेच्या माध्यमातून परळी शहर आणि तालुक्यातील १६ गावातील नागरिकांसोबत प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षपणे संपर्क आल्याचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंगमध्ये स्पष्ट झाले आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग अजून वाढू नये यासाठी जिल्हाधिकार्‍यांनी शनिवारी रात्री उशिरा आदेश काढत १२ जुलै पर्यंत संपूर्ण परळी शहरात संचारबंदी लागू केली आहे. तर, तालुक्यातील १६ गावात कंटेनमेंट झोन घोषित करण्यात येऊन ती गावे अनिश्चित कालावधीसाठी पूर्णवेळ बंद करण्यात आली आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या