वैजनाथ साखर कारखाना दुर्घटना, ४ ठार

244

सामना प्रतिनिधी । बीड/परळी-वैजनाथ

परळी तालुक्यातील पांगरी साखर कारखान्यात शुक्रवारी दुपारी उसाच्या रसाची टाकी फुटल्याने १२ कर्मचारी गंभीर भाजले होते. यापैकी ४ जणांचा मृत्यू झाला आणि ५ जणांची प्रकृती गंभीर आहे.

मधुकर पंढरीनाथ आदनाक (५०), सुभाष गोपीनाथ कराड (४५), गौतम तुकाराम घुमरे (रा. गाढेपिंपळगाव) आणि सुमित भंडारी (रा. देशमुख टाकळी) या चौघांचा साखर कारखान्यातील दुर्घटनेत मृत्यू झाला.

वाफेचा दाब वाढल्याने इव्हॅपोरेटरच्या खालच्या बाजूचा जोड दुभंगून आतील १२० डिग्री सेल्सिअसपेक्षाही अधिक तप्त उकळता रस आणि वाफेचे मिश्रण वेगाने बाहेर फेकले गेले. हा गरम रस अंगावर पडून १२ जण जखमी झाले होते. जखमींवर लातूर येथील लहाने रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींपैकी बहुतांश कामगार परळी तालुक्यातील आहेत. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, खासदार प्रीतम मुंडे आणि कारखान्याच्या संचालिका अॅडव्होकेट यशश्री मुंडे यांनी जखमींची लातूर येथे भेट घेतली.

अपघातातील मृतांच्या घरच्यांना कारखान्याच्या व्यवस्थापनामार्फत तीन लाख रुपये आणि मुख्यमंत्री मदतनिधीमधून दोन लाख रुपये दिले जाणार आहेत. तसेच मुंडे कुटुंबातर्फे मृतांच्या घरच्यांना एक लाख रुपये व कुटुंबातील एका व्यक्तीस कारखान्यात नोकरी दिली जाणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या