सभागृह घोषणाबाजी आणि गदारोळासाठी नाहे; लोकसभा सभापतींनी भाजप खासदारांना खडसावले, कामकाज ठप्प

राहुल गांधी यांनी लंडनमधील विधानाबाबत माफी मागावी, ही सत्तापक्षाची मागणी तर अदानीप्रकरणी संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी व्हावी ही विरोधकांची मागणी आजही कायम राहिली. त्यामुळे दोन्ही बाजूंनी झालेल्या घोषणाबाजी व गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. लोकसभेत सभागृहाचे कामकाज सुरू होताच भाजप खासदारांनी घोषणाबाजीला सुरुवात केल्यामुळे सभापती ओम बिर्ला कमालीचे संतापले. सभागृह हे घोषणाबाजी आणि गदारोळासाठी नाही, कामकाजासाठी आहे. जनहिताचे काम होऊ द्यात, असे संतप्तपणे नमूद करत सभापतींनी लोकसभेचे कामकाज तहकूब केले.

राहुल गांधी यांनी माफी मागावी, हा हेका सत्ताधारी पक्षाने आजही कायम ठेवला, तर अदानी प्रकरणाची जेपीसीमार्फत चौकशी करा, अशी मागणी विरोधकांनी लावून धरली. गेल्या आठवडय़ात कामकाजाच्या अखेरच्या दिवशी शुक्रवारी विरोधी बाकांवरील सदस्यांचे माईक म्यूट करण्यात आले होते. तसेच राहुल गांधी यांनाही बोलण्यास अनुमती नाकारण्यात आली होती. त्यामुळे विरोधक अधिकच संतप्त झाले, मात्र नियम 357 अंतर्गत नोटीस आल्यास सदस्याला बोलण्याची परवानगी देण्यात येईल, असे सभापती ओम बिर्ला यांनी स्पष्ट केले. लोकसभेत दोन्ही बाजूंनी सुरू असलेली घोषणाबाजी पाहून सभापती संतापले. हे सभागृह घोषणाबाजी व गदारोळासाठी नाही. संसदेत काहीच कामकाज होत नाहीये. जनहिताचे काम होऊ द्यात, असे सांगत सभापतींनी लोकसभेचे कामकाज दुपारी दोनपर्यंत तहकूब केले. त्यानंतरही गदारोळ कायम राहिल्याने कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.

राज्यसभेतही राहुल यांनी माफी मागावी ही सत्ताधाऱयांची मागणी तर अदानीप्रकरणी विरोधकांची जेपीसीची मागणी या गदारोळात कामकाज होऊ शकले नाही. सभागृहाचे कामकाज सुरू होताच गदारोळाला सुरुवात झाली. त्यामुळे सुरुवातीला कामकाज दुपारी दोन व त्यानंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.