काँग्रेसचा मोदी सरकारवर आरोप, कामकाज सोमवारपर्यंत तहकूब

राहुल गांधी यांनी लंडनमध्ये केलेल्या विधानाबद्दल माफी मागावी यासाठी सत्ताधारी पक्षानेच संसदेच्या दोन्ही सभागृहांत गदारोळ केल्याने संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या उत्तरार्धाचा पहिला आठवडा बिनकामाचा ठरला. आज दोन्ही सभागृहांचे कामकाज सुरू होताच अवघ्या विसेक मिनिटांतच दोन्ही सभागृहांचे कामकाज सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आले.

लोकसभेत आज कामकाज सुरू झाले मात्र लोकसभा टीव्हीवर त्याचे प्रसारण दिसत नव्हते, आवाजही येत नव्हता. कामकाज तहकूब झाल्यानंतरच हे प्रसारण दिसायला सुरुवात झाली. इतके दिवस माईक बंद करणाऱया सरकारने आज संसदेलाच ‘म्यूट’ केले, असा आरोप काँग्रेसने केला.

राहुल गांधी बोलणार होते, पण

सभागृहात  आज राहुल गांधी माफी मांगो,’ हा धोशा सत्ताधाऱयांनी लावला. राहुल गांधी या वेळी सभागृहात उपस्थित होते आणि त्यांची या विषयावर मुद्दा मांडायचीही तयारी होती. मात्र हाऊस आऊट ऑफ ऑर्डर आहे, त्यामुळे सभागृह कसे चालवणार, असे उद्गार काढत सभापती ओम बिर्ला यांनी कामकाज सोमवारपर्यंत तहकूब केले. सभागृह सुरळीत चालले तर सर्वांनाच बोलायची संधी मिळेल, असेही त्यांनी नमूद केले.

राज्यसभेतही गदारोळ

राज्यसभेतही ‘राहुल गांधी माफी मांगो’ म्हणत सत्ताधाऱयांनी गदारोळाला सुरुवात केली. सभापती जगदीप धनखड यांनी एपंदरीत रागरंग ओळखून कामकाज सोमवारपर्यंत तहकूब केले. सरकारकडून जवळपास 35 विधेयके मंजूर होणे बाकी आहे. शिवाय अनुदान मागण्या व इतर विषयांवरही चर्चा अपेक्षित असताना संपूर्ण आठवडा बिनकामाचा गेल्याने उर्वरित अधिवेशन काळात कामकाज सुरळीतपणे चालविण्याचे आव्हान सरकारपुढे असेल. अर्थात राहुल गांधींचा मुद्दा नाहक उपस्थित केल्यामुळेच संसदेत गोंधळ निर्माण झाला आहे. उर्वरित अधिवेशनात सरकार कशी भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष असेल.

राज्यसभेत अदानी मुद्दय़ावर चर्चा करा, आप खासदार संजय सिंह यांची नोटीस

नवी दिल्ली राज्यसभेचे नियमित कामकाज स्थगित करून अदानी मुद्दय़ावर चर्चा करण्याची मागणी आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांनी शुक्रवारी केली. अदानी यांनी सार्वजनिक पैशांचा गैरवापर केला आहे आणि केंद्र सरकार जनतेला उत्तरदायी आहे. कोटय़वधी रुपयांच्या नुकसानीबाबत पंतप्रधान मोदींचे मौन संशयास्पद आहे. या विषयावर सखोल चर्चा होणे ही काळाची गरज असल्याचे संजय सिंह यांनी म्हटले आहे. दरम्यान दोन्ही बाजूच्या सदस्यांनी अदानी-हिंडेनबर्ग प्रकरणाच्या चौकशीवरून घातलेल्या गोंधळामुळे राज्यसभेचे कामकाज सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आले.