संसद ठप्पच! राहुल गांधींची माफी; जेपीसीच्या मुद्द्यावरून गदारोळ सुरूच

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लंडनमध्ये केलेल्या विधानावरून सत्ताधारी पक्षाने आजही संसदेच्या दोन्ही सभागृहांत घोषणाबाजी करून गदारोळ घातला. सत्ताधारी राहुल यांच्या माफीनाम्याची मागणी करत असतानाच विरोधकांनी अदानीप्रकरणी संयुक्त संसदीय समिती (जेपीसी ः मार्फत चौकशी करण्याची मागणी लावून धरली. परिणामी आजही दोन्ही सभागृहांत दुपारपर्यंत कामकाज चालू शकले नाही. लोकसभेत जम्मू-कश्मीरच्या अर्थसंकल्पावर छोटेखानी चर्चा झाली. त्यानंतर लोकसभेचे कामकाज तहकूब करण्यात आले.

लोकसभेचे कामकाज सुरू होताच सत्ताधारी पक्षाच्या खासदारांनी ‘राहुल गांधी माफी मांगो’च्या घोषणा दिल्या, तर विरोधकांनी प्रत्युत्तरादाखल ‘वुई वॉण्ट जेपीसी’च्या घोषणा दिल्या. राज्यसभेतही सुरुवातीला याच मुद्दय़ावरून गदारोळ झाला. त्यामुळे कामकाज दुपारी दोन व त्यानंतर पुन्हा गदारोळ सुरूच राहिल्याने दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.

राज्यसभेचे सदस्य नाहीत, मग माफी कशाची?

राहुल गांधी हे राज्यसभा सभागृहाचे सदस्य नाहीत. मग त्यांनी माफी मागावी, अशी मागणी राज्यसभेत कशी काय केली जात आहे, असा सवाल उपस्थित करत राज्यसभेतील विरोधी पक्षनेते व काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी राहुल यांच्या माफीची मागणी फेटाळून लावली. त्यानंतर राज्यसभेचे कामकाज 23 मार्चपर्यंत तहकूब करण्यात आले.