एक मुलगा हॉस्पिटलमध्ये, दुसऱ्याला वेळ नाही; कोरोनाग्रस्त वृद्धाच्या चितेला तहसीलदारांनी दिला मुखाग्नी

पारनेर तालुक्यातील किन्ही येथील एका वृद्धाचे कोरोनामुळे निधन झाले. त्यांचा एक मुलगा कोरोनाबाधित असून, दुसऱया मुलाने येण्यास असमर्थता दर्शविल्याने तहसीलदार ज्योती देवरे यांनी प्रशासनाच्या वतीने वृद्धावर अंत्यसंस्कार केले. कोरोना महामारीमुळे प्रशासनाच्या प्रमुख म्हणून देवरे या मृतदेहाला मुखाग्नी देत असताना उपस्थितांच्या अंगावर अक्षरशः शहारे आले होते. हिंदू संस्कृतीप्रमाणे सर्व विधी देवरे यांनी यावेळी पार पाडले.

गुरुवारी (दि. 15) संबंधित वृद्धाची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आल्याने कर्जुले हर्या येथील मातोश्री रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले होते. सुरुवातीस त्यांनी उपचारांना प्रतिसाद दिला. त्यानंतर मात्र त्यांची प्रकृती खालावली. शनिवारी तेथील डॉक्टरांनी त्याच्या मुलाशी संपर्क करून वडिलांची प्रकृती खालावली असून, त्यांना पुढील उपचारांसाठी घेऊन जाण्याची सूचना केली होती. परंतु ते कर्जुले येथे पोहचलेच नाहीत. ‘जीवनदायी’ योजनेअंतर्गत असलेले उपचारांचे बिलही मंजूर झाले नाही. त्याकडेही रुग्णालय प्रशासनाने दुर्लक्ष केले. अखेर सोमवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास त्यांचे रुग्णालयात निधन झाले. रुग्णालय प्रशासनाने त्यांच्या मुलाला पुन्हा संपर्क साधून वडिलांचे निधन झाल्याचे कळविले. मात्र, ‘दुसऱया दिवशी येतो,’ असे सांगण्यात आल्याने रुग्णालयाने प्रशासनाशी संपर्क करून त्यासंदर्भात माहिती दिली.

कोरोनाबाधित रूग्णाचा मृतदेह अधिक काळ ठेवणे धोकादायक असल्याने तहसीलदार ज्योती देवरे यांनी तो पारनेर येथे पाठविण्याची सूचना दिली. वृद्धाच्या मुलाशी संपर्क केला असता, त्याने तत्काळ येणे शक्य नसल्याचे सांगितले. त्यांचा एक भाऊ रुग्णालयात उपचार घेत असल्याचेही त्यांनी सांगितले. कोरोनामुळे गावातील लोकही अंत्यविधीस येऊ शकत नव्हते. मुलानेही असमर्थता दर्शविल्याने अखेर प्रशासनानेच अंत्यविधी करण्याचा निर्णय घेतला. पारनेर नगरपंचायत हद्दीतील अमरधाममध्ये सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास हिंदू धर्मपद्धतीप्रमाणे प्रशासनाच्या वतीने तहसीलदार ज्योती देवरे यांनी संबंधित वृद्धावर अंत्यसंस्कार केले.

नगरपंचायतीने स्मशान जोगी व्यक्तीचा पगार थकविला

n पारनेर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्काराच्या वेळी नातेवाईकांना मदत करण्यासाठी व स्मशानभूमीच्या देखभालीसाठी स्मशान जोगी समाजातील व्यक्तीची तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, या स्मशानभूमीची देखभाल करणाऱया व्यक्तीचा वर्षभराचा पगार नगरपंचायतीने थकविल्याने तो काम सोडून गेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांवर अंत्यसंस्कार करण्यात अडचणी येत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या