पारनेरमध्ये भिसे वस्तीवर दरोडेखोरांचा धुमाकूळ, तीन लाखांचे दागिने लांबवले; एकजण जखमी; वृद्धेलाही मारहाण

पारनेर शहरातील सुपे रस्त्यावरील, कन्हेर ओहोळ परिसरातील भिसे वस्तीवर रविवारी पहाटे दरोडेखोरांनी सुमारे तीन लाख रुपये किमतीचे पाच तोळे सोन्याचे दागिने लांबवले. यावेळी दरोडेखोरांनी केलेल्या मारहाणीत सुभाष भिसे गंभीर जखमी झाले. कर्णफुले काढून देण्यासाठी चोरांनी वृद्धेलाही निर्दयपणे मारहाण केली आहे.

रविवारी पहाटेच्या सुमारास राजेंद्र सदाशिव भिसे यांच्या बंगल्याच्या गच्चीवरून चार दरोडेखोरांनी बंगल्यात प्रवेश करीत तेथे झोपलेल्या राजेंद्र भिसे व कुटुंबीयांना मारहाण करण्याची धमकी देत त्यांच्याजवळील दोन तोळे सोन्याचे दागिने ताब्यात घेतले. दरम्यान, राजू भिसे यांनी दरोडेखोरांच्या तावडीतून सुटका करून घेत बंगल्याबाहेर पळ काढला. त्यांनी आरडाओरडा सुरू केल्यानंतर दरोडेखोर त्यांच्यावर दगडविटांचा मारा करीत पसार झाले. त्यानंतर जवळच्या सुभाष पर्वती भिसे यांच्या घराला दरोडेखोरांनी लक्ष्य केले. त्यांच्या घराचे दार कटावणीने उचकटून चौघांनी घरात प्रवेश केला. तेथे सुभाष भिसे यांची वृद्ध आई तसेच मुलगा झोपलेले होते. दरोडेखोरांनी वृद्धेला अंगावरील दागिने काढून देण्यासाठी धमकावले. शेजारच्या खोलीत झोपलेल्या सुभाष यांना आवाजाने जाग आल्यानंतर ते दार उघडून आत येताच एकाने सुभाष यांच्या डोक्यावर लोखंडी गजाने प्रहार केला. सुभाष यांच्या पत्नीच्या अंगावरील दागिन्यांसह वृद्धेच्या अंगावरील दागिने काढून देण्यासाठी चोरटे दरडावत होते. सुभाष यांच्या पत्नीने स्वतःचे व सासूचे दागिने दरोडेखोरांकडे सुपूर्द केले. वृद्धेच्या कानातील कर्णफुले काढता येत नसल्याने संतापलेल्या चोरांनी वृद्धेस मारहाण केली.

सुभाष भिसे यांच्या घरातील ऐवज ताब्यात घेतल्यानंतर शेजारीच राहत असलेले त्यांचे भाऊ बाळू भिसे यांच्या घराकडे चोरांनी मोर्चा वळवला. त्यांच्या घराच्या दारावर दगड मारून दाराचा काही भाग त्यांनी तोडला. त्यातून एकाने आत प्रवेश करून दार उघडले. त्यानंतर बाळू व त्यांच्या कुटुंबीयांना चौघांनी धमकाविण्यास सुरुवात केली. दरम्यानच्या काळात भिसे वस्तीवर दरोडेखोरांचा धुमाकूळ सुरू असल्याची माहिती समजल्यानंतर अनेक तरुणांनी तिकडे धाव घेतली. तरूण भिसे यांच्या घराकडे येत असल्याचे पाहून बाळू भिसे यांच्या घरातून चारही दरोडेखोरांनी पळ काढला.

मराठी व हिंदी भाषेत संभाषण

मराठी व हिंदी भाषेत बोलणाऱया दरोडेखोरांनी आपले चेहरे पांढऱया कापडाने झाकले होते. वस्तीवर व आजूबाजूला दरोडेखोरांची चाहूल लागलेली असतानाही ते न घाबरता भिसे कुटुंबीयांना दरडावत ऐवज ताब्यात घेत होते. जमा झालेले तरूण भिसे वस्तीकडे येत असल्याचे लक्षात आल्यानंतर मात्र त्यांनी घटनास्थळावरून पळ काढला.