फिर्यादी व साक्षिदारच निघाले आरोपी, गावठी कट्टा हाताळताना झाला गोळीबार

708

टोळक्याकडून झालेल्या गोळीबारात जखमी झाल्याचा जबाब नोंदविणारा फिर्यादी तसेच साक्षिदारच घटनेतील आरोपी निघाल्याचा धक्कादायक प्रकार पारनेरमध्ये उघडकीस आला आहे. या प्रकरणी जखमी फिर्यादी तसेच त्यास मदत करणा-या त्याच्या मेहूण्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरूवारी सकाळी दहाच्या सुमारास संजय बाळू पवार (वय 23 रा. राळेगणथेरपाळ, ता. पारनेर) हा दुचाकीवरून गुणौरे मार्गे टाकळीहाजी येथे मेहूणा दादाभाऊ चव्हाण यांना भेटण्यासाठी चालला होता. टाकळीहाजी ते गुणौरे दरम्यान चार तरूणांची भांडणे सुरू होती. ती पाहण्यासाठी संजय थांबला असता चौघांपैकी एक पळू लागल्याने उर्वरीत तिघांपैकी एकाने पळ काढणा-या साथीदारावर पिस्तुलातून गोळीबार केला. ती गोळी संजय पवार याच्या दंडास लागून तो जखमी झाल्याचा बनाव संजय पवार व त्याचा मेहूणा दादाभाउ चव्हाण यांनी रचला होता. तसा जबाब पोलिसांकडे नोंदविण्यात आल्यानंतर पोलिसांची तपासाची चक्रे फिरविली व फिर्यादी तसेच साक्षिदार यांचा बनाव उघड झाला.

शिरूर जि. पुणे येथील खाजगी रूग्णालयात उपचार घेत असलेल्या संजय पवार याचा जबाब नोंदविल्यानंतर पोलिसांनी साक्षिदार व संजय याचा मेहूणा दादाभाऊ चव्हाण यांची कसून चौकशी केली. त्यात संजय याने दिलेला जबाब तसेच दादाभाऊ देत असलेली माहिती यात तफावत आढळून आली. ज्या ठिकाणी गोळीबार झाला, त्या ठिकाणची पाहणी केली असता गोळी तेथे गोळीबर झाल्यानंतर गोळीची पुंगळी अथवा रक्ताचे डागही आढळून आले नाहीत. त्यामुळे पोलिसांचा संशय अधिकच बळावला. चव्हाण यास पोलिसी खाक्या दाखविल्यानंतर मात्र त्याने खरा घटनाक्रम पोलिसांपुढे कथन केला.

firing

जखमी संजय पवार याच्याकडे गावठी कट्टा होता. तो कसा हाताळायचा याची माहिती नसल्याने ती करून घेण्यासाठी संजय मेहूण्याकडे गेला होता. मेहुण्याचे घरी कट्टा हाताळत असतना कट्टयातून गोळी सुटली व संजय याच्या दंडाला चाटून गेली. गावठी कट्टयातून गोळीबार झाल्याने पोलिसांचा ससेमिरा नको म्हणून संजय व दादाभाऊ यांनी चौघा तरूणांच्या टोळक्याच्या गोळीबारात संजय याच्या दंडाला गोळी लागल्याचा बनाव रचला गेला. पोलिस तपासात मात्र बनाव उघड झाला.

आपली प्रतिक्रिया द्या