पर्रीकर यांना निवडणूक आयोगाची नोटीस

नवी दिल्ली, दि. 1 (वृत्तसंस्था) – 500 रुपये खुशाल घ्या पण मते मात्र भाजपलाच द्या, असे खुलेआम आवाहन करीत मतदारांना लाच घेण्यास उद्युक्त केल्याबद्दल संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांना आज केंद्रीय निवडणूक आयोगाने नोटीस बजावली. पंजाबसोबत गोव्यातही येत्या शनिवारी 4 फेब्रुवारीला विधानसभा निवडणुकीचे मतदान पार पडणार आहे.

पर्रीकर यांचे वक्तव्य सकृतदर्शनी निवडणूक आचारसंहितेचा भंग करणारे आहे, असा निष्कर्ष आयोगाने काढला आहे. संरक्षणमंत्र्यांना शुक्रवारपर्यंत स्पष्टीकरण करण्यास सांगण्यात आले आहे. त्यांच्याकडून समाधानकारक स्पष्टीकरण प्राप्त न झाल्यास एकतर्फी कारवाई करण्यात येईल, असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. मनोहर पर्रीकर यांच्या विरोधात ‘आम आदमी पार्टी’ आणि ‘गोवा फॉरवर्ड पार्टी’ने तक्रार केली होती.