चॅनेलवाल्यांपुढे प्रतिष्ठा जपण्यासाठी केला सर्जिकल स्ट्राईक

12

सामना वृत्तसेवा – पणजी

पाकिस्तानमध्ये घुसून करण्यात आलेल्या सर्जिकल स्ट्राईक मागच्या कारणाचा पर्रिकर यांनी खुलासा केला आहे. पाकिस्तानमधील सर्जिकल स्ट्राइक हे एका न्यूज चॅनेलच्या अँकरने विचारलेल्या अपमानजक प्रश्नाचं उत्तर होतं असा खुलासा गोव्याचे मुख्यमंत्री आणि माजी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी केला आहे.

‘हिंदुस्थानी लष्कराने थेट म्यानमारमध्ये घुसून केलेल्या कारवाईनंतर एका टीव्ही अँकरने केंद्रीय मंत्री राज्यवर्धन सिंह राठोड यांना प्रश्न विचारला होता. हा माझ्यासाठी एक अपमान होता. यामुळेच पाकिस्तानव्याप्त कश्मीरमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राईक करण्याची योजना आखली’, असं पर्रिकर यांनी ताळगाव येथील एका कार्यक्रमात बोलताना स्पष्ट केले.

पर्रिकर यांनी हिंदुस्थान-म्यानमार सीमारेषा आणि हिंदुस्थान-पाकिस्तान सीमेवर करण्यात आलेल्या सर्जिंकल स्ट्राईकसंबंधी माहिती दिली. कशाप्रकारे या सर्जिंकल स्ट्राईकची आखणी करण्यात आली हेदेखील त्यांनी सांगितलं. पर्रिकर यांनी सांगितलं की, ‘जेव्हा मला मणिपूरमध्ये ६ डोग्रा रेजिमेंटवर हल्ला झाल्याची आणि त्यात १८ जवान शहीद झाल्याची माहिती मिळाली तेव्हा ते मला खूप अपमानजक वाटलं. माझ्यासाठी तो वैयक्तिक अपमान होता’. ‘नॅशनल सोशलिस्ट काऊन्सिल ऑफ नागालँडसारख्या छोट्या दहशतवादी संघटनेकडून इतक्या हिंदुस्थानी जवानांचा मृत्यू होणं हा माझ्यासाठी अपमानच होता’, असं पर्रिकर यांनी अधोरेखित केले. त्यानंतर ८ जून रोजी हिंदुस्थानी लष्कराने थेट म्यानमारमध्ये घुसून आपल्या जवानांच्या हत्येचा बदला घेत दहशतवाद्यांचा खात्मा केला होता.

‘आम्ही कोणतीही माहिती दिली नसताना ही बातमी लीक झाली होती. मात्र एका प्रश्नाने माझा अपमान झाला. केंद्रीय मंत्री राज्यवर्धन सिंह राठोड एका कार्यक्रमात कशाप्रकारे सर्जिकल स्ट्राईक करण्यात येते याची माहिती सांगत होते. यावेळी न्यूज अॅकरने त्यांनी तुम्ही हिच हिंमत वेस्टर्न फ्रंटवर दाखवणार का ? असा प्रश्न विचारला. एक यशस्वी सर्जिंकल स्ट्राईक केल्यानंतर हा माझ्यासाठी अजून एक अपमान होता. मात्र मी ते शांतपणे ऐकून घेतलं, आणि वेळ आल्यावर याचं उत्तर द्यायचं ठरवलं’, असं मनोहर पर्रीकरांनी सांगितलं.

आपली प्रतिक्रिया द्या