मावळमध्ये हरलेला पार्थ, पवार घराण्यातला पहिला पराभूत उमेदवार

37

सामना ऑनलाईन । मुंबई

संपूर्ण महाराष्ट्राचे मावळ मतदारसंघाकडे लक्ष लागले होते त्याचे कारण पवारांची चौथी पिढी राजकारणात पदार्पण करणार होती. शरद पवारांचे नातू आणि अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार मावळमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. मावळ मतदारसंघात शिवसेनेच्या श्रीरंग बारणेंनी विजयाची हॅट्ट्रिक साजरी केली आहे.

राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांनी माढा मतदारसंघातून माघार घेत आपल्या नातवाला मावळमधून उमेदवारी दिली होती. परिणामी पवार घराण्यासाठी ही जागा प्रतिष्ठेची झाली होती. पार्थच्या प्रचारासाठी खुद्द शरद पवार, वडिल अजित पवार आणि आत्या सुप्रिया सुळे उतरल्या होत्या.

परंतु पार्थचा बारणेंपुढे टिकाव लागला नाही. बारणे यांचे नेतृत्व अनुभवी आहे  तर पार्थचे नेतृत्व नवखे आहे. बारणेंना 7 लाख 20 हजार 663 मते मिळाली तर पार्थला 5 लाख 4 हजार 750 मते मिळाली. मतमोजणीच्या फेरीत बारणे यांनी सुरूवातीपासूनच आघाडी घेतली होती. ती अखेरपर्यंत कायम होती.

2008 साली पुर्नरचनेत मावळ मतदासंघ निर्माण झाला होता.या लोकसभा निवडणुकीत सहा विधानसभा मतदारसंघापैकी तीन पश्चिम महाराष्ट्रातील आहेत तर तीन कोकणातील आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांचे वर्चस्व आहे. इथली एकगठ्ठा मते पार्थच्या पारड्यात पडतील असा कयास होता.

हा पराभव शरद पवारांनी मान्य केला तसेच. मावळमध्ये राष्ट्रवादीचा प्रभाव वाढवण्यासाठी पार्थला उमेदवारी दिली होती असेही पवार यावेळी म्हणाले होते.

आपली प्रतिक्रिया द्या