‘एनडीए’मध्ये खदखद, ‘एककल्ली’ भाजपविरुद्ध घटक पक्षांत वाढता असंतोष

70

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

२०१९मध्ये स्वबळावर लढण्याचा ‘आवाज’ शिवसेनेने दिल्याच्या पाठोपाठ भाजपच्या एककल्ली धोरणाविरोधात ‘एनडीए’मधील घटक पक्षांच्या मनातील खदखद बाहेर पडू लागली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लोकसभा निवडणूक लवकरच घेण्याच्या विचारात असतानाच मित्र पक्षांचा व्यक्त होणारा असंतोष भाजपला महागात पडू शकतो, असे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.

‘एनडीए’त घटक पक्ष असलेल्या ‘तेलगू देसम’चे नेते, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनीही मित्र पक्षांसोबतच्या वर्तनाबद्दल भाजपवर तोफ डागली आहे. भाजप हा मित्र धर्माचे पालन करीत नाही. तसेच आघाडीच्या राजकारणाचे नीतीनियम धाब्यावर बसवत आहे, अशा शब्दांत त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.

नायडू यांनी राज्याच्या विकासाबाबत आंध्रातील जनतेला बरीच आश्वासने दिली होती; पण त्यासाठी निधीच दिला जात नसल्याने ते पंगू झाले आहेत. त्याच वेळी त्यांच्या राज्यातील चंद्राबाबू यांचे विरोधक वाय. जगन मोहन रेड्डी यांच्याशी भाजपने जवळीक वाढवली आहे. त्यामुळे चंद्राबाबू संतापले आहेत.

बिहारमध्ये राष्ट्रीय लोक समता पार्टी आणि माजी मुख्यमंत्री जितन मांझी यांचा हिंदुस्थान अवाम मोर्चा हे दोन मित्र पक्ष भाजपची साथ सोडून जाण्याच्या वाटेवर आहेत. ते लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाकडे जातील, अशी चर्चा त्या राज्यात जोरदार सुरू आहे.

राष्ट्रीय लोक समता पार्टी या भाजपच्या मित्र पक्षाने शिक्षणाच्या मुद्दय़ावर लक्ष वेधण्यासाठी मानवी साखळी आंदोलन नुकतेच केले. त्या आंदोलनाकडे ‘एनडीए’तील भाजप आणि नीतीश कुमार यांच्या संयुक्त जनता दलातील कोणीही नेता फिरकला नाही, पण राष्ट्रीय जनता दलाच्या नेत्यांची उपस्थिती त्या आंदोलनात लक्षणीय होती. त्यामुळे जितन मांझी आणि राष्ट्रीय लोक समता पार्टीचे नेते उपेंद्र कुशवाह हे लालूंकडे वळण्याची शक्यता आहे.

– ‘एनडीए’तील मित्र पक्षांच्या अध्यक्षांना गेल्या साडेतीन वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘७ लोक कल्याण मार्ग’ येथे कधी कपभर चहासाठी बोलावले आहे काय, असा सवाल भाजपवर नाराज झालेल्या मित्र पक्षांचे नेते विचारू लागले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या