महाराष्ट्राची फाळणी, मुंबईची तोडणी! भाजप विजयाची धोक्याची घंटा!

160

 

 

<<  रोखठोक  >>  संजय राऊत

मुंबईसह महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाला मोठे यश मिळाले. पण हे यश निर्विवाद आहे काय? जातीय, प्रांतीय व महाराष्ट्रद्वेषाच्या भावनेतून ज्या समाजाने रांगा लावून शिवसेनेच्या विरोधात मतदान केले त्या विजयाच्या जल्लोषात मराठी नेतेच फुगड्या घालताना दिसतात. मुंबई आणि महाराष्ट्राचा धोका जास्तच वाढतो आहे. मुंबईत शिवसेनेचा पराभव करण्यासाठी सत्ता-संपत्तीचा अफाट वापर झाला, पण भाजप जिंकू शकला नाही!

bmc

महाराष्ट्रातील राजकारण ढवळून काढणाऱ्या निवडणुका अखेर पार पडल्या आहेत. यात मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लक्षवेधी ठरली. मुंबईच्या निवडणुकीत शिवसेना पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला. बहुमताचा ११४ आकडा शिवसेना गाठू शकली नाही, पण सतत पाच निवडणुकांत शिवसेना लोकांच्या पहिल्या पसंतीचा पक्ष ठरला. एखाद्या पक्षाला मुंबईत पूर्ण बहुमत मिळणे यापुढे शक्य नाही. मुंबई भाजपचे अध्यक्ष श्री. आशीष शेलार हे मतदानाच्या अखेरच्या दिवसापर्यंत ११४ जागा जिंकू असे छातीठोकपणे सांगत होते. मुंबईची जनता श्री. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर संपूर्ण विश्वास दाखवेल अशी त्यांना खात्री होती, पण भारतीय जनता पक्षाच्या प्रचार जाहिरातींत मोदी व अमित शहांचे फोटो कुठेच दिसले नाहीत. मराठी लोकं भाजपला मतदान करणार नाहीत असे त्यांना वाटले, पण मुंबईत ८२ जागा मिळाल्यानंतर भाजपच्या जाहिरातींत मोदी-शहांचे फोटो झळकले हे महत्त्वाचे. शेवटी भाजपचे समाधान इतकेच की, शिवसेनेच्या बरोबरीने त्यांना जागा मिळाल्या, पण शिवसेनेचा पराभव ते करू शकले नाहीत. मुंबई-ठाण्यातून शिवसेनेचा संपूर्ण पराभव हे त्यांच्या पक्षाचे एकमेव उद्दिष्ट व त्यासाठी सत्ता-संपत्तीचा वापर हुकूमशाही पद्धतीने केला. मुंबई जिंकण्यासाठी इतकी अरेरावी काँग्रेस शासकांनीही केली नव्हती. कारण काँग्रेसमधील मराठी नेतृत्व हे मुंबई महाराष्ट्रात राहावी याच ठाम भूमिकेचे, महाराष्ट्राचे तुकडे पडू नयेत व त्यासाठी शिवसेनेची ताकद मुंबईत राहायलाच हवी हे श्री. शरद पवार यांच्यासारख्या मोठ्या नेत्यांचेही मत. भारतीय जनता पक्षाला मुंबईचे महत्त्व हे व्यापाऱ्यांच्या हितासाठीच वाटत राहिले. महाराष्ट्र तुटावा ही त्यांची राजकीय भूमिका. ज्या पक्षांना महाराष्ट्र अखंड राहावा असे वाटत नाही त्यांनाच मुंबईतून शिवसेनेचा पराभव व्हावा असे वाटते. मुंबईत शिवसेनेचा पराभव हा भूमिपुत्रांचा व मराठी माणसांचा पराभव. मुंबईतील उपरे व्यापारी, अमराठी मतदार व अल्पसंख्याक ‘जैन’ समाजास हाताशी धरून शिवसेनेच्या पराभवासाठी भाजप मैदानात उतरला. शिवसेनेचा पराभव ते आज करू शकले नाहीत, पण त्यांना आज मिळलेले यश ही उद्याच्या धोक्याची घंटा आहे. मुंबई आज भौगोलिकदृष्टय़ा एक असली तरी सामाजिकदृष्टय़ा ती दुभंगली आहे.

भाजप मोठा पक्ष

नगरपालिका निवडणुकांत भारतीय जनता पक्षाला याआधी यश मिळाले. सर्वाधिक नगराध्यक्ष त्या पक्षाचे निवडून आले. आता दहा महानगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकांत ते दिसले. दहा महानगरपालिका आणि २६ जिल्हा परिषदांच्या निवडणुकांत भारतीय जनता पक्षाची सरशी झाली हे स्वीकारायला हवे. पण काही अपवाद वगळता हा विजय निर्विवाद आहे काय? मुंबईत गुजराती, जैन व इतर भाषिकांच्या पाठिंब्याने भाजपास ८२ जागा मिळाल्या. यात मराठी माणूस एकसंध राहिला नाही. शिवसेनेच्या पाठीशी तो प्रामुख्याने उभा राहिला, पण एक विशिष्ट वर्ग भाजपच्या पुंगीमागे डोलू लागला. तसे झाले नसते व ‘मराठी’ माणसाने मराठी म्हणूनच मतदान केले असते तर भाजपच्या सत्ता-पैशांचे मातेरे करून शिवसेना शंभर जागांवर सहज गेली असती. मुसलमान समाजाने यावेळी शिवसेनेच्या पारड्यांत मते टाकली, पण मोदी-शहांसाठी गुजराती-जैन समाज भाजपच्या रांगेत उभा राहिला. सर्व संकटकाळी शिवसेना त्यांच्या पाठीशी उभी राहिली हे ते नेमके विसरले. ठाण्यावर आजही ‘मराठी’ संस्कृतीचा पगडा आहे. तेथे भाजप सरळ तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेला व शिवसेना पूर्ण बहुमताने जिंकली. उल्हासनगरात कलानी कंपनीच्या मदतीने भाजपने विजय मिळविला. भाजप सत्तेत नसती तर कलानी त्यांच्याबरोबर नसते. जिथे सत्ता तिथे कलानी, पण उल्हासनगरात शिवसेना भाजपच्या बरोबरीने आहे. नागपूरच्या बालेकिल्ल्यात भाजप शत-प्रतिशत आणि अमरावती-अकोल्यात चांगल्या स्थितीत आहे. पुणे-पिंपरी-चिंचवडमधील त्यांचा विजय हा काँग्रेस-राष्ट्रवादीला धोका आहे. पुणे महानगरपालिकेत भारतीय जनता पक्षाला ९६ जागा मिळाल्या! हा सगळ्यांनाच धक्का. असे कोणते काम भाजपच्या मंत्र्यांनी पुण्यात करून दाखवले की, ज्यामुळे भाजपला ९६ जागा मिळाल्या? विजयाची पूर्ण खात्री असलेले काँग्रेसचे उमेदवार युवराज शहा यांचा फोन मला आला. ते म्हणाले, ‘वातावरण पूर्ण माझ्या बाजूने असतानाही मी हरलो. माझ्या मतदारसंघात पैशांचे वाटप झाले आणि मतदानाच्या ईव्हीएम मशीनमध्ये काही गडबड केल्याशिवाय इतकी प्रचंड मते भाजपला मिळू शकणार नाहीत.’’ नोटाबंदीनंतर निवडणुकीतून पैशांचा वापर संपेल हा भ्रम या निवडणुकीने दूर केला. मुंबईत पैशांचे वाटप करताना जे उमेदवार पकडले ते सर्व भाजपचे होते व पोलिसांवर दबाव असा की, त्यांनी पैसे वाटपासंदर्भात तक्रारी घ्यायलाच नकार दिला. हे राज्यात सर्वत्र घडले. सत्ता-संपत्तीचा वापर विजय मिळवण्यासाठी झाला व त्या विजयाबद्दल पंतप्रधान मोदी यांनी मतदारांचे आभार मानले. मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन केले.

evm

आकडे काय सांगतात?

२६ जिल्हा परिषदांचे निकाल संमिश्र किंवा अधांतरी आहेत. सिंधुदुर्ग, रत्नागिरी व रायगड या कोकणातील एकाही मतदारसंघात भाजप उरलेली नाही. पुण्याच्या ग्रामीण भागात राष्ट्रवादी आहे. नगर जिल्ह्यांतही काँग्रेस-राष्ट्रवादी, नाशिक जिल्हा परिषदेत शिवसेनेची आघाडी आहे. परभणी आणि बीड जिल्हय़ात राष्ट्रवादी आहे. नांदेड व धाराशीवमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना आहे. साताऱ्यात संपूर्ण राष्ट्रवादी. यवतमाळ जिल्हय़ात शिवसेना भाजपाच्या पुढे असे चित्र आहे. सोलापुरात काँग्रेस-राष्ट्रवादीने भाजपास मागे टाकले. कोल्हापुरातही भाजप निर्विवादपणे उभी नाही. चंद्रपूर, बुलढाणा, वर्धा जिल्हय़ांत भाजप आहे. हे खरे असले तरी राज्याचे चित्र अधांतरी आहे.

मोठा धक्का

भारतीय जनता पक्ष हा महाराष्ट्राच्या बाबतीत सर्वात जास्त धोकादायक आहे. मुंबईबाबत त्यांची नियत साफ नाही व महाराष्ट्राच्या बाबतीत त्यांची भूमिका फाळणीची आहे आणि ही भूमिका पुढे नेणारे भारतीय जनता पक्षातील मराठी नेते आहेत हे मराठी राज्याचे दुर्दैव आहे! मुंबईत मोठय़ा संख्येने अमराठी नगरसेवक निवडून आले व त्यातील बहुसंख्य लोक महाराष्ट्राचा द्वेष करणारे आहेत. आमच्याकडे पैसे आहेत आणि पैशांच्या जोरावर हवे ते विकत घेऊ शकतो, हा माज यापुढे वाढत जाईल. मुंबईसारखी शहरे त्यांच्यासाठी पैसे कमवण्याचे आणि ओरबाडण्याचे साधन आहे. दिल्लीचीही तीच मानसिकता आहे. १९९२ च्या जातीय दंगलीत ज्यांनी कड्या -कुलुपे लावून स्वतःला कोंडून घेतले त्या सर्व समाजाने जातीय आणि धार्मिक उन्मादातून आज भाजपला मतदान केले. भाजपला झालेले मतदान हे विकासाला मतदान नाही. शिवसेना आणि मराठीद्वेषातून हे सर्व मतदान झाले व त्यास भाजपातील मराठी नेत्यांनी हातभार लावला. संयुक्त महाराष्ट्र लढय़ात स. का. पाटील यांची भूमिका यावर आपण आजही टीका करतो, पण महाराष्ट्र तोडण्याची भाषा करणाऱ्या, भाजप विजयाचा जल्लोष करणाऱ्या भाजपातील मराठी पुढाऱ्यांनी स. का. पाटील यांच्या पुढची मजल गाठली. महाराष्ट्रासाठी जे लढले व मुंबईसाठी जे मेले त्यांच्या बलिदानाचा हा अपमान आहे.

एक व्हा!

महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाने मुसंडी मारली म्हणजे नक्की काय केले? काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता असताना त्यांच्या पक्षाने मुसंडी मारलीच होती. काँग्रेसच्या राजवटीत झाला नाही त्यापेक्षा जास्त पैशांचा वापर निवडणुका जिंकण्यासाठी सध्या सुरू आहे व नोटाबंदीनंतरही इतक्या नोटा कशा उपलब्ध झाल्या हा चिंतेचा विषय आहे. इतके होऊनही मुंबईचा घास भारतीय जनता पक्षाला गिळता आला नाही. मोदींचे नेतृत्व व फडणवीस यांची धडपड असूनही भाजपचा घोडा ८२ वर अडला तो शेवटी शिवसेनेमुळेच. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांतही तेच झाले. ‘महाराष्ट्र आणि मुंबई तोडण्याच्या बाबतीत प्रत्येक वेळी शिवसेनाच आडवी येईल, तेव्हा शिवसेनेचा पराभव घडवून आणा’ ही भाजपची रणनीती आहे. भारतीय जनता पक्षाची सध्याची मुसंडी ही राजकारणातील तात्पुरती व्यवस्था आहे. त्यांचा प्रत्येक प्रयत्न हाणून पाडण्याची ताकद फक्त शिवसेनेत आहे. सर्वच राजकीय पक्षांतील मराठी जनांनी एक होण्याची हीच वेळ आहे.

 [email protected]

आपली प्रतिक्रिया द्या