रेल्वे प्रवाशांना खूषखबर, सुपरफास्ट ट्रेनमधे तिकीट मिळणार  

41
प्रातिनिधिक रेल्वे

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

वारंवार रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक खूषखबर आहे. आता धावत धावत जाऊन तिकीट काढून धावत्या ट्रेन मध्ये चढण्याची पळापळ करण्याची गरज नाही. ट्रेन सुटत असेल आणि तुमच्याकडे तिकीट नसले तरी तुम्ही ट्रेनमध्ये चढा. त्वरीत गाडीतील टीटीईशी संपर्क साधा. रेल्वे ट्रेनमधील टीटीई दहा रुपये जादा आकार घेऊन तुम्हाला हँड हेल्ड मशिनने तिकीट देईल. येत्या १ एप्रिलपासून रेल्वेने ही तिकीट व्यवस्था सुरु करण्याचे ठरविले असून तूर्त ही व्यवस्था सुपरफास्ट ट्रेनसाठी लागू असली तरी लवकरच लांब पल्ल्याच्या गाडीतही ही व्यवस्था लागू होणार आहे.

यासाठी विनातिकीट यात्रा करणाऱ्या प्रवाशांनी ट्रेनमधील टीटीईचा शोध घ्यावा लागेल. आपल्याकडे तिकीट नसल्याची माहिती प्रवाशाने दिल्यावर टीटीई संबधीत प्रवाशाला आपल्याकडील हँडहेल्ड मशिनद्नारे तिकीट देईल. मात्र प्रवाशाला त्यासाठी भाडेदरापेक्षा दहा रुपये जादा आकार द्यावा लागेल.

याखेरीज ट्रेनमधील रिकामे बर्थ बाबतची माहितीही हँडहेल्ड मशिनवर मिळेल. वेटिंग तिकीट स्पष्ट न झालेल्या प्रवाशांला टीटीईकडे जाऊन आपल तिकीट किलअर करावे लागेल. या नव्या सुविधेमुळे प्रवाशांची ट्रेन चुकणार नाही. टीटीई आणि त्याचे पथक प्रवाशांकडून मनमानी पद्धतीने दंड वसूल करू शकणार नाहीत. प्रवाशाने आपले नाव व जाण्याचे ठिकाण सांगताच टीटीई त्याला तिकीट देईल.

टीटीईकडील हँडहेल्ड मशीन रेल्वेच्या प्रवाशी आरक्षण प्रणालीशी जोडलेली असेल. त्यामुळे कोणत्या स्थानकावर बर्थ अथवा जागा रिकामी होणार आहे याची आगाऊ माहिती प्रवाशांना मिळेल. दरम्यान, ही सुविधा सुपरफास्ट ट्रेनमधे उपलब्ध करण्याचे रेल्वे बोर्डाचे आदेश आहेत. मात्र अन्य ट्रेनबाबत मध्य अथवा पश्चिम रेल्वेला कोणतेही निर्देश देण्यात आलेले नसल्याची माहिती रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्याने दिली.

 

आपली प्रतिक्रिया द्या