दुर्गंधी येणारे मोजे घातल्याने पोलिसांनी केली अटक

18

सामना ऑनलाईन । धर्मशाला

आपल्यापैकी बऱ्याच जणांची दुर्गंधीत मोजे घातलेल्या व्यक्तींची गाठ पडली असेल. त्यावेळी आपल्याला त्या व्यक्तीचा प्रचंड राग येतो, मात्र आपल्याला अनेकदा याविरूद्ध काही करणं शक्य होत नाही. पण धर्मशालामध्ये एक वेगळाच प्रकार समोर आला आहे. एसी बसमध्ये प्रवास करणाऱ्या बिहारच्या एका प्रवाशाला त्याच्या मोज्यांना दुर्गंधी येत असल्याने अटक करण्यात आल्याची घटना समोर आली आहे.

प्रकाश कुमार असं या प्रवाशाचं नाव असून तो २६-२७ नोव्हेंबरच्या रात्री धर्मशालेकडून दिल्लीकडे येणाऱ्या एका व्होल्वो बसमधून प्रवास करत होता. प्रवासादरम्यान त्याने बसमध्ये त्यांचे बूट आणि मोजे काढले. त्यावेळी मोज्यांमधून येणाऱ्या दुर्गंधीमुळे त्रासलेल्या इतर प्रवाशांनी त्याला बूट आणि मोजे त्याच्या बॅगेत ठेवायला किंवा मग बाहेर फेकून द्यायला सांगितले.

प्रकाशने त्याच्या बूट आणि मोज्यांबाबत इतर प्रवाशांनी सांगितलेल्या गोष्टींकडे दुर्लक्ष केले. तसेच त्याने बूट आणि मोजे बाहेर फेकण्यासही नकार दिला. यानंतर प्रवासी आणि प्रकाश यांच्यामधील वाद अधिकच वाढला. अखेरीस दुर्गंधीमुळे त्रासलेल्या प्रवाशांनी एका पोलीस स्टेशनजवळ बस थांबवून त्याबाबत तक्रार दाखल केली. प्रवाशांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी प्रकाशला अटक केली. प्रकाशला विभागीय न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर हजर केले असता त्याला जामीन मंजूर करण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या